रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांड : 29 मे रोजी संशयिताच्या जामिनावर सुनावणी
Borkheda massacre in Raver taluka : Bail hearing of suspect on May 29 भुसावळ : राज्यात गाजलेल्या रावेर तालुक्यातील बोरखेडा बु.॥ येथील हत्याकांड प्रकरणी भुसावळ सत्र न्यायालयात 13 मार्चपासून सुनावणीला सुरूवात झाली होती. या खटल्याप्रकरणी संशयिताच्या जामिनावर सोमवार, 8 मे रोजी भुसावळ सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती मात्र अतिरीक्त सत्र न्यायाधीश- 3 न्या.आर.एम.जाधव हे सुटीवर असल्याने या खटल्याची सुनावणी आता 29 मे रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, बोरखेडा बु.॥ शिवारातील एका शेतात 14 वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आल्यानंतर तिच्यासह चौघा भावंडांची कुर्हाडीचे वार करीत अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. 15 ऑक्टोंबर 2020 रोजी घडलेल्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.
असे आहे नेमके प्रकरण
बोरखेडा शिवारातील एका शेतात पत्नी पाच मुलांसह मध्यप्रदेशातील एका गावातील सालदार वास्तव्यास होते. सालदारकी करून कुटुंबाचा रहाटगाडा हाकणारे सालदार हा पत्नी व लहान मुलाला घेवून मध्यप्रदेशातील मूळ गावी 14 ऑक्टोबर 2020 रोजी गेल्यानंतर घरी चारही मुले एकटीच होती. ही संधी साधून नराधम आरोपीने मध्यरात्रीच्या सुमारास 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केला व त्याचवेळी भावंडांना जाग आल्यानंतर 11 व 8 व तीन वर्षीय भावंडांची कुर्हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आली होती. हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचा तपास करीत आरोपी महेंद्र बारेला (22) यास निष्पन्न करून त्यास बेड्या ठोकल्या व हल्लीदेखील आरोपी कारागृहातच आहे.
29 मे रोजी होणार सुनावणी
बोरखेडा हत्याकांड प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार होती मात्र न्या.जाधव हे सुटीवर असल्याने या खटल्याची सुनावणी आता 29 व 30 मे रोजी होणार आहे. या खटल्यासाठी शासनाने विशेष सरकारी वकील अॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. न्यायालयीन तारखेवर संशयिताच्या जामिनावर युक्तीवाद होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
