रेल्वेत अन्न वितरणाद्वारे मुंबईच्या कंपनीला सहा लाखांचा गंडा : भुसावळातील त्रिकूट जाळ्यात
तिघा डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा : खोटे स्क्रिनशॉट पाठवून कंपनीची फसवणूक
6 lakhs to a Mumbai company through food delivery by train : Three in a trap in Bhusawal भुसावळ : रेल्वेतील आयआरसीटीसी कंपनीची अधिकृत भागीदार कंपनी असलेल्या रोडिओ ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज प्रा.लि. कंपनीला भुसावळातील डिलेव्हरी बॉय त्रिकूटाने तब्बल सहा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीनही संशयितांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
असे आहे नेमके प्रकरण
रेल्वे प्रवाशांना प्रवासात अन्न पुरवठा (फूड डिलेव्हरी) करण्यासाठी आयआरसीटीसी कार्यरत असून या कंपनीची अधिकृत भागीदार मुंबईतील रोडिओ ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज प्रा.लि. ही कंपनी कार्यरत आहे. रेल्वेतील प्रवाशांनी प्रवासादरम्यान ऑनलाईन जेवणाची ऑर्डर केल्यानंतर संबंधित स्थानकावरील डिलेव्हरी बॉय रोखीने अथवा ऑनलाईन पैसे स्वीकारून प्रवाशांना अन्नाचा पुरवठा करतात. भुसावळ रेल्वे स्थानकासाठी कंपनीने मयूर मगर, रोहित बडगे, शुभम बाविस्कर यांना 2022 मध्ये नियुक्त केले होते. प्रवाशांकडील ऑर्डरचे पैसे जमा करून ते ऑनलाईन जमा करण्याची जवाबदारी तीनही कर्मचार्यांची होती मात्र त्यांनी वर्षभरात पैसे जमा केलेच नाहीत शिवाय काही व्यवहारात पिक्सआर्ट या अॅपमध्ये छेडछाड करून पावत्या कंपनीला पाठवल्याचे उघड झाले. अपहाराचा प्रकार 22 सप्टेंबर 2022 ते 23 एप्रिल 2023 दरम्यान घडला.
कंपनीला लावला पाच लाख 94 हजारांचा चुना
संशयितांकडून कंपनीला फूड ऑर्डर मिळत असल्या तरी त्यापोटी जमा होणारी रक्कम मिळत नसल्याने कंपनीने याबाबत चौकशी सुरू केली असता संशयितांनी काही पाठवलेल्या पावत्या या इडिट केल्याचे व त्यातून व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाले. संशयित मयूरने 69 हजार 500, रोहित दोन लाख 90 हजार 500 व शुभम याने दोन लाख 34 हजार 100 रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधितांनी तसा कबुलीनामा कंपनीला लिहून दिला तर संबंधितांकडे कंपनीने गैरव्यवहार केलेल्या रकमेची मागणी केली मात्र संशयितांनी पैसे परत करण्यास नकार दिल्याने रीजनल एक्झीकेटीव्ह सेंट्रल हेड मुदूत जितेंद्र गुप्ता (25, रा.149 बँकर स्ट्रीट मसुरीयन, न्यू कोहिनूरजवळ, मसुरीया, जोधपूर, राजस्थान) यांनी बाजारपेठ पोलिसात सोमवारी रात्री आठ वाजता बाजारपेठ पोलिसात मयूर मगर, रोहित बडगे, शुभम बाविस्कर (तिघे रा.भुसावळ) यांच्याविरोधात गुरनं.188/2023, भादंवि 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे करीत आहेत.
