शिवपूर कन्हाळेत पोलिसांचे वॉश आऊट : एक लाख 16 हजारांचे रसायन नष्ट
Police wash out in Shivpur Kanhale : Chemicals worth one lakh 16 thousand destroyed भुसावळ : तालुक्यातील शिवपूर कन्हाळे येथे पुन्हा गावठी दारूच्या भट्ट्या सुरू झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी पहाटे छापा टाकून दोन दारू भट्ट्यावरील एक लाख 16 हजारांचे रसायन नष्ट करण्यात आले. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक संशयित पसार झाला आहे. या कारवाईने शिवपूर कन्हाळा भागातील अवैधरीत्या दारूचा व्यवसाय करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. दरम्यान, यापूर्वी येथे अनेकदा पोलिसांनी कारवाया केल्या मात्र पुढचे पाढे पंच्चावन्न असा प्रकार होत असल्याने समूळ दारू भट्ट्या उद्ध्वस्त होण्याची अपेक्षा आहे.
सकाळच्या सुमारास कारवाई
भुसावळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील हवालदार सुरज पाटील, यासीन पिंजारी व नाईक संकेत झांबरे यांच्यासह 11 कर्मचार्यांनी बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शिवपूर कन्हाळा भागातील नाल्यात धाड टाकत संशयित सुभान तुकडू गवळी (52, शिरपूर कन्हाळा) यास ताब्यात घेतले तर संशयित युनूस हसन गवळी (43) हा मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच पसार झाला. या प्रकरणी नाईक संकेत झांबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
