भुसावळसह यावलला विविध मागण्यांसाठी पत्रकार संघटनेचे आंदोलन
भुसावळ : राष्ट्रीय पातळीवर काम करणारी व्हाईस ऑफ मिडिया संघटनेकडून गुरुवारी भुसावळसह यावल येथे तहसीलदार कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. आपल्या विविध मागण्या करीता घोषणा देण्यात आल्या मोठ्या संख्येत या वेळी पत्रकार उपस्थित होते.
यावलला धरणे आंदोलन
यावल तहसील कार्यालयासमोर पत्रकार बांधवांच्या व्हाईस ऑफ मिडिया संघटनेकडून जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार महेश पवार यांना निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारीतेत पाच वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात.साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. या प्रसंगी व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष ललित फिरके, कार्याध्यक्ष डी.बी.पाटील, नंदकिशोर अग्रवाल, नितीन झांबरे, समीर तडवी, तेजस यावलकर, याकुब पिंजारी, संतोष वराडे, सुनील गावडे, विक्की वानखेडे, शाहरूख खान, काबीज शेख, रीजवान कलाही, शेखर पटेलसह पत्रकार उपस्थित होते.

भुसावळात प्रशासनाला निवेदन
भुसावळ ः विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मीडियाच्या भुसावळ तालुका कार्यकारणीतर्फे गुरुवारी आंदोलन करण्यात आले. संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार श्रीकांत जोशी, संघटनेचे जिल्हा प्रवक्ते संजयसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. संघटनेच्या तालुकाअध्यक्ष उज्वला बागुल, सचिव सुनील आराक, संजय काशीव, सतीश कांबळे, सुनील वानखेडे, मनोहर लोने, प्रेम परदेशी, संजय ठाकुर , मनीषा शिरतुरे यांच्यासह कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते.
