f Shri Sant Muktabai in the 726th Anthardhan ceremony श्री संत मुक्ताबाई 726 वा अंतर्धान सोहळ्यात लाखो भाविक मुक्ताई चरणी नतमस्तक
Lakhs of devotees prostrated themselves at the feet of Shri Sant Muktabai in the 726th Anthardhan ceremony मुक्ताईनगर : श्री क्षेत्र कोथळी येथे आदिशक्ती श्री संत मुक्ताईचा 726 वा अंतर्धान समाधी सोहळा (Shri Sant Muktabai in the 726th Anthardhan ceremony) रविवार, 14 मे रोजी पार पडला. देशभरातील विविध भागातून आलेले लाखो भाविक संत मुक्ताई चरणी याप्रसंगी लीन झाले. संत नामदेव महाराज यांचे सोळावे वंशज हभप केशव नामदास महाराज (पंढरपूर) यांच्या पुष्पवृष्टीच्या कीर्तनाने रंगत वाढवली. याप्रसंगी मुक्ताईनगरातील श्री संत मुक्ताईला एक क्विंटल 20 किलो आंब्याची आरास लक्षवेधी ठरली. श्री संत मुक्ताईवर गुलालाच्या कीर्तनात पुष्पवृष्टी करण्यात आली.
याची देहा, याची डोळा साठवला प्रसंग
आदिशक्ती संत मुक्ताई या शके 1219 मधे वैशाख वद्य दशमीच्या दिवशी 17 वर्षे सात महिने 24 दिवसांच्या असतांना सर्वांदेखत तिरोभुत (गुप्त) झाल्या. व याच समयाला आकाशात लख्ख वीज प्रगटली व ती वीज जुने कोथळी येथे सद्याचे मुक्ताई मंदिर परीसरात पडली. या दिवसाला 14 मे 2023 रोजी 726 वर्ष पूर्ण होत असल्याने आदिशक्ती संत मुक्ताईचा तिरोभुत पुण्यतिथी सोहळा हजारो भाविकांच्या साक्षीने साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी श्री पांडुरंग परमात्मा पादुका पालखी सोहळा पंढरपूर तसेच संत नामदेव महाराज पादुका पालखी सोहळा पंढरपूर व संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पादुका सोहळा त्रंबकेश्वर तसेच रुक्मिणी माता पादुका पालखी सोहळा, कौडीण्यपूर दाखल झाल्याने देव व संताच्या हजेरी अंतर्धान सोहळा रंगला लाखो भाविकांनी आपल्या डोळ्यात हा प्रसंग साठवला.

लाखो भाविक मुक्ताई चरणी लीन
यावेळी संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्याहस्ते संत मुक्ताईची महाआरती करण्यात आली, प्रसंगी माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विकास ढगे, अभय टिळक, संत निवृत्तीनाथ संस्थानचे निलेश गाढवे पाटील, विश्वस्त तथा पूजारी जयंत महाराज गोसावी, संत सोपान काका संस्थानचे त्रिभूवन महाराज गोसावी, पांडुरंग परमात्मा पादुका पालखी सोहळ्याचे मेघराज वळखे, अमोल पाटील, सुर्यकांत भिसे, रुख्मिणी माता संस्थानचे सर्जेराव देशमुख, संत नामदेव महाराज संस्थानचे तथा संत नामदेव महाराज वंशज केशवदास नामदास महाराज (अप्पा) व इतर विश्वस्त तसेच संत गजानन महाराज संस्थानचे कौस्तुभ निळकंठराव पाटील, देहुकर फडाचे बिभीषण महाराज आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
अंतर्धान सोहळ्याच्या कीर्तनाने डोळे पाणावले
रविवारी पहाटे श्री संत मुक्ताईला अभिषेक करण्यात आला व त्यानंतर दाखल झालेल्या पादुका पालखी सोहळ्याचा मुक्ताई मंदिरात प्रवेश झाला. पादुका व पालखी सोहळ्यांचे स्वागत श्री संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.रवींद्र हरणे, ह.भ.प.उद्धव जुनारे आदींनी केले. रविवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास संत नामदेव महाराज यांचे 16 वे वंशज ह.भ.प केशवदास महाराज यांनी आदिशक्ती मुक्ताईचे चरीत्र डोळ्यासमोर उभे केले व त्या काळातील प्रसंग, चौघा भावंडांचे झालेले हाल मांडत असतानाच महाराजांसह उपस्थित असलेल्या भाविकांचे डोळे पाणावले. गुलालाच्या कीर्तनानंतर पृष्पवृष्टी करून अंतर्धान सोहळ्याची सांगता झाली.
मुक्ताईनगरात श्री मुक्ताईला आंब्याची आरास
श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथील नव्या मुक्ताई मंदिरातही दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले व भाविकांची मोठ्या संख्येने दर्शनार्थ गर्दी उसळली. अंतर्धान समाधी सोहळ्यानिमित्त अजाबराव शेषराव पाटील (वरणगाव) यांच्याकडून मुक्ताईला एक क्विंटल 20 किलो आंब्याची आरास करण्यात आली.
आज निघणार श्री पांडुरंग पालखी सोहळा
अंतर्धान सोहळ्या निमित्त रविवारी मुक्कामी दाखल झलेला परमात्मा पांडुरंगाचे पादुका पालखी सोहळ्याची सोमवार, 15 रोजी सकाळी मुक्ताईनगर शहरातून मिरवणूक काढली जाणार आहे. श्री क्षेत्र कोथळी मुक्ताई मंदिर ते मुक्ताईनगर शहरातील नवे मुक्ताई मंदिरादरम्यान ही शोभायात्रा निघणार आहे.
