हरताळे येथे विवाहितेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा
पतीचे भांडण सोडवताना आरोपीने विवाहितेचा केला विनयभंग
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे 29 वर्षीय विवाहित संशयितासोबत पतीचे झालेले भांडण सोडवत असताना आरोपीने महिलेचा हात पकडत तिला अश्लील शिविगाळ करीत विनयभंग केला. ही घटना सोमवारी दुपारी सव्वातीन वाजता घडली. या प्रकरणी संशयित महेश दयाराम शेळके (हरताळा) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भांडण सोडवताना विनयभंगाचा आरोप
29 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार, संशयित महेश शेळके हे सोमवारी दुपारी सव्वातीन वाजता विवाहितेच्या पतीला शिविगाळ करीत एखाद्या दिवशी तुला पाहून घेईल, अशी धमकी देत असताना पतीला बाजूला करण्यासाठी विवाहिता गेल्यानंतर आरोपीने अश्लील शिविगाळ करीत महिलेचा हात पकडून विनयभंग केला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहेत.
