गाडगेबाबा अभियांत्रिकीत सेंटर ऑफ एक्सेलन्सची स्थापना
आगामी चार वर्षांचा संशोधनाचा आराखडा तयार
भुसावळ : ‘संशोधनाचा वेग वाढल्याने सध्या तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असून सध्याच्या शिक्षण प्रणालीतून बाहेर पडणारे इंजिनिअर्स उद्योगक्षेत्राची गरज भागवू शकतात, असे मत पुणे येथील सॉफ्टटेक डेटा सेक्युरिटीचे महासंचालक अमेय तांबे यांनी येथे व्यक्त केले. भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय व सॉफ्टटेक डेटा सेक्युरीटी पुणे यांच्यात ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’ या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा.आय.डी.पॉल, प्रा.धीरज पाटील, प्रा.राहुल चौधरी, प्रा.अतुल गाजरे, व्ही.व्ही.भेलसेकर उपस्थित होते.
‘नवकल्पनांना आणि नवउद्योजकांना प्रेरणा देणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंटर ऑफ एक्सेलन्स प्रकल्प उपयुक्त ठरेल, उद्योजकांनाही त्याचा फायदा होईल,’ असेही अमेय तांबे म्हणाले.
पुढील चार वर्षांचा संशोधनाचा प्लॅन तयार
‘उद्योगक्षेत्राला अपेक्षित असणार्या नव्या तंत्रज्ञानाप्रमाणे ज्ञान अद्ययावत करण्यास, क्षमतावृद्धी करण्यास आणि रोजगारक्षम होण्यास मदत होणार आहे’. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि उद्योग जगताची परीपूर्ण अभियंत्यांची गरज भागावी यासाठी हा ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’ हा प्रकल्प उभारण्यात आला आहे, असे डॉ.आर.पी.सिंह यांनी सांगितले. ‘चांगल्या अभियांत्यांची निर्मिती करणे हे या प्रकल्पामागचे खरे उद्दिष्ट आहे. रोजच्या रोज तंत्रज्ञानात बदल होत आहेत, या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना अभियंत्यांना खूप अवघड जाते. ग्राहकांच्या समस्या सोडविणारे तंत्रज्ञान निर्मिती हाच यामागचा उद्देश आहे, ‘पुढील चार वर्षांचा संशोधनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असे डॉ.सिंह म्हणाले.



