भुसावळात अवैध गॅस रीफिलींग : एकाविरुद्ध गुन्हा


सहा गॅस सिलिंडरसह 14 हजारांचा मुद्देमाल जप्त : महसूलच्या पथकाची तापी नगरात कारवाई

भुसावळ : जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे आलेल्या तक्रारीनंतर भुसावळात सुस्तावलेल्या तहसील प्रशासनाला जाग आल्यानंतर तापी नगरात अवैधरीत्या सुरू असलेले गॅस रीफिलींग केंद्रावर धाड टाकून सहा सिलिंडरसह 14 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कारवाई शुक्रवारी दुपारी दोन वाजता करण्यात आली. या प्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शहरात अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करणार्‍या वाहनांमध्ये अवैधरीत्या गॅस भरला जात असताना तहसील प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व संताप व्यक्त होत आहे. शहरात अनेक ठिकाणी अशा पद्धत्तीचे गॅस रीफिलींग होत असताना कारवाई का नाही? हे न उलगडणारे कोडे आहे.

पुरवठा अधिकार्‍यांकडे तक्रार : तहसील प्रशासनाला जाग
शहरातील तापी नगर भागातील एका पत्राच्या शेडमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलींडरमधून वाहनात गॅस भरला जात जात असल्याची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे आली होती त्यानंतर त्यांनी भुसावळ तहसीलदार दीपक धीवरे यांना माहिती देत कारवाईच्या सूचना केल्या. तत्पूर्वी पुरवठा निरीक्षक प्रदीपसिंग राजपूत व राजेश तायडे, जितेंद्र तायडे यांनी याबाबत खातरजमा केली. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एन.एस.तडवी यांच्या घराजवळ दोन बाय सहा आकाराच्या पत्री शेडमध्ये काळ्या-पिवळया रंगाची अ‍ॅटो रीक्षा (एम.एच.19 जी.डब्ल्यू.2926) उभी असताना त्यात घरगुती वापराच्या सिलिंडरमधून रीक्षात गॅस भरणे सुरू असताना महसूल विभागाचे पथक धडकले तर रीक्षा चालक मात्र वाहनासह पसार झाला. या वाहनात शेरखा नबाब तडवी (रा.गणपती नगर, भुसावळ) हा अवैधरित्या गॅस भरीत असल्याने त्यांच्या विरूध्द येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




14 हजारांचा मुद्देमाल जप्त
घटनास्थळावरून नऊ हजार रुपये किंमतीचे सहा सिलिंडर व गॅस भरण्यासाठी वापरली जाणारी पाच हजार रुपये किंमतीची एक इलेक्ट्रीक मोटर असा एकूण 14 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शनिवारी दुपारी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी तपास करीत आहे.

शहरात खुलेआम रीफिलिंग
शहरातील अनेक भागात खुलेआमपणे अवैधरीत्या वाहनांमध्ये घरगुती सिलिंडर भरून दिले जात असताना स्थानिक तहसील व पोलिस प्रशासन हातावर हात धरून असल्याने आश्‍चर्य व संताप व्यक्त होत आहे. अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करणार्‍या ओमनी वाहनात सर्रासपणे घरगुती सिलिंडरचा गॅस वापरला जात असताना अप्रिय घटना घडल्यास जवाबदार कोण? असा प्रश्‍नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !