कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण : डॉ.तुषार पाटील


Comrade marathon completed due to family support : Dr. Tushar Patil भुसावळ : दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध व सर्वात जुन्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये 87.7 किमी धावून भुसावळसह जिल्ह्याचे नाव उंचावणारे डॉ. तुषार पाटील यांचे शहरात आगमन झाल्यानंतर गुरुवारी भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंतर्फे मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे प्रमुख प्रा. प्रवीण फालक यांनी डॉ.तुषार पाटील यांना शाल, हार व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. सत्काराला उत्तर देताना डॉ.तुषार पाटील म्हणाले, की मी ही मॅरेथॉन केवळ कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्यामुळे व भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या सर्व धावपटूंच्या सदिच्छांमुळे यशस्वीपणे निर्धारीत वेळेत पूर्ण करू शकलो त्यामुळे हा त्यांचा विजय आहे. रनर्स ग्रुपमुळे माझी विशेष ओळख आहे असेदेखील ते म्हणाले. त्यांच्या सोबत दक्षिण आफ्रिकेला गेलेले व या मॅरेथॉनमध्ये सर्व भारतीय धावपटूंसाठी धावदूत ठरलेले विकास पाटील व संतोष गवळे यांचादेखील विशेष सन्मान करण्यात आला. अतिशय कौटुंबिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. तुषार यांच्या धर्मपत्नी डॉ.चारुलता पाटील यांनादेखील डॉ.निलिमा नेहेते, स्वाती फालक व पूनम भंगाळे या महिला धावपटूंनी सन्मानीत केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील तर आभार डॉ.चारुलता पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजेंद्र ठाकूर, शेख रीझवान, पारुल वर्मा, छोटू गवळी, विकी खडसे यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी प्रवीण वारके, रणजीत खरारे, सचिन अग्रवाल, ब्रिजेश लाहोटी, गणसिंग पाटील, विजय फिरके, संजय भदाणे, जितेंद्र चौधरी, सीमा पाटील, पुष्पलता चौधरी, मुकेश चौधरी, संतोष घाडगे, दीपा स्वामी, आरती चौधरी, स्वाती भोळे, ममता ठाकूर, स्नेहा महाजन, नीलांबरी शिंदे आदी धावपटू उपस्थित होते.

रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत
दक्षिण आफ्रिकेहून परतल्यानंतर डॉ. तुषार पाटील यांचे बुधवारी पहाटे चार वाजता रेल्वेने शहरात आगमन झाले. यावेळी भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन व परीवारातील सदस्यांतर्फे रेल्वे स्टेशनवर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. निवासस्थानी डॉ.चारुलता पाटील यांनी औक्षण केले. याप्रसंगी डॉक्टरांचे वडील प्रभाकर पाटील, बंधू डॉ.नितीन पाटील, वहिनी सीमा पाटील, उदय गवळे, मनोज राणे, संजय चौधरी, प्रा.प्रवीण फालक, राजेंद्र ठाकूर, विजय फिरके, प्रवीण पाटील उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !