रेल्वेद्वारे चिमुकल्यांचे तस्करी प्रकरण : भुसावळात अटक केलेल्या मौलानाचा जामीन फेटाळला
Child smuggling case by railway : Maulana arrested in Bhusawal denied bail भुसावळ : 01040 दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याच्या तक्रारीनंतर भुसावळात रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी भुसावळात 29 चिमुकल्यांची सुटका केली होती. मानवी तस्करीच्या कलमान्वये या प्रकरणी संशयित मौलाना मोहम्मद अंजर आलम मोहम्मद सैय्यद अली (44, डूबा, जोकिहाट, अररीया, बिहार, ह.मु.पेठभाग वालवा, काझी गल्ली, काझी मशीद, आस्ठा, जि.सांगली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली होती. ही कारवाई 30 मे 2023 रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर करण्यात आली होती.
चिमुकल्यांची सुटका मात्र मौलाना कोठडीतच
मौलाना मोहम्मद अंजर आलम मोहम्मद सैय्यद अली यास 30 मे रोजी अटक केल्यानंतर दुसर्या दिवशी 31 मे रोजी न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत संशयिताने चिमुकल्यांची तस्करी होत नसून त्यांना सांगलीत मदरशामध्ये शिक्षणासाठी नेत असल्याचा जवाब दिला होता. लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी बिहारात जावूनही पालकांचे जवाब नोंदवले तर भुसावळा येवूनही बिहारातील पालकांनी जवाब देत मुलांची तस्करी होत नसल्याचे लिहून देत त्यांना शिक्षणार्थ सांगलीत मौलानासोबत पाठवल्याचे सांगितले होते. मुस्लीम संघटनांनी या संदर्भात जिल्हाधिकार्यांची भेट घेतल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी जळगाव बाल निरीक्षण गृहात असलेल्या 29 चिमुकल्यांची बिहारातील अररीया बालकल्याण समितीकडे रवानगी करण्याचे आदेश दिल्यानंतर मंगळवार, 13 जून 2023 रोजी एलटीटी-भागलपूर रेल्वेद्वारे रवाना झाले होते. दरम्यान, तस्करीच्या आरोपावरून ताब्यात असलेला संशयित मौलाना मोहम्मद अंजर आलम हा न्यायालयीन कोठडीतच असल्याने त्यास जामीन मिळावा म्हणून भुसावळ सत्र न्यायालयात न्या.आर.एम.जाधव यांच्या न्यायासनापुढे जामिनासाठी अर्ज करण्यात आला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने मौलाना यांचा जामीन अर्ज मंगळवारी फेटाळल्याने मौलानाचा मुक्काम पुन्हा कारागृहात वाढला आहे.




खंडपीठात दाद मागण्याचा पर्याय
9 जून रोजी भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक तथा गुन्ह्याचे तपासाधिकारी विजय घेर्डे यांनी संशयित मौलाना जामीन मिळू नये, असे लेखी म्हणणे (से) पाठवले होते. त्यात गुन्ह्याचा तपास अद्याप बाकी असल्याचे नमूद केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, भुसावळ सत्र न्यायालयात मौलानाचा जामीन फेटाळला गेल्यानंतर आता खंडपीठात जामिनासाठी पर्याय असल्याचे सूत्रांनी सांगितले.