वरणगाव पाणीपुरवठा योजनेवरची स्थगिती दोन दिवसात उठवणार


पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वरणगाव नगराध्यक्षांना ग्वाही

भुसावळ : वरणगाव पाणीपुरवठा योजनेवरची स्थगिती दोन दिवसात उठवण्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे यांना दिली. सोमवारी जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. प्रसंगी माजी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या उपस्थिती होती.

हा तर वरणगावकरांवर अन्याय
सभेत वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगावला तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी 25 कोटींची 24 तास असणारी पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती शिवाय योजनेचे टेंडर सुद्धा निघाले मात्र आपल्या सरकारने मंजूर योजनेला स्थगिती दिल्याने वरणगावकारांनवर अन्याय झाला असून तत्काळ स्थगिती उठवण्याची मागणी करण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात चर्चा होऊन मंजूर वरणगाव पाणीपुरवठा योजनेवरची स्थगिती दोन दिवसात उठवण्याचे ठोस आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. वरणगाव शहरात सिद्धेश्वर नगर या भागात नागरीकांना स्वतः जवळ असलेली अतिक्रमित घरे त्यांच्या नावावर करण्यात यावे, प्रभाग क्रमांक 17 व 18 मध्ये दलित वस्ती, अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह व गटार बांधकामाला दलित वस्तीतून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी यास मंजुरी देण्याचे आश्‍वासन दिले.



समस्या निकाली काढण्याचे आश्‍वासन
वरणगावातील कब्रस्थानकडे जाणार्‍या महामार्गावर पुल बांधण्यात यावा , अशी मागणी नगराध्यक्ष काळे यांनी करीत तीर्थक्षेत्र योजनेतून स्वामी समर्थ मंदिराला, रेणुका माता मंदिराला तीर्थ क्षेत्राचा ‘क’ चा दर्जा देउन निधीची मागणी करण्यात आली. रेल्वे स्टेशन ते बस स्थानक रस्त्याच्या कामाला गतीने सुरवात करण्यात यावी, भोगावती नदी सुशोभीकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, अशी मागणीही नगराध्यक्षांनी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी समस्या निकाली काढण्याचे आदेश दिले


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !