अपघात घडवून लूट : दोघे आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
Robbery by causing an accident : Two accused in MIDC police net जळगाव : तरुणाच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर वाद घालून लूट केल्याचा प्रकार घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संशयिताना न्या.सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. राहुल नाना राजपूत आणि रितेश भिकन चौधरी (दोघे रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.
असे आहे लूट प्रकरण
15 ऑगस्टच्या सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तारिक अल्ताफ खाटीक हा तरुण मेहरुण तलावावर दुचाकीने फिरण्यास गेला होता. त्यावेळी चौघा जणांनी त्याच्या दुचाकीला धडक देत त्याला खाली पाडले. अपघात झाल्याचा वाद घालून मारहाण करीत तारीक याच्याकडील मोबाईल आणि इतर वस्तू घेत चौघे फरार झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासाअंती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीनंतर चौघांपैकी दोघांना अटक करण्यात आली. दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. पसार दोघांचा शोध सुरु आहे.








