दीपनगर वसाहतीत चोरी : निंभोर्यातील तिघे आरोपी जाळ्यात
भुसावळ ; दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या वसाहतीतून चोरट्यांनी गत आठवड्यात लोखंडी पाईपासह अॅल्युमिनिअम तारेची चोरी झाली होती. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीवरून सुरुवातीला एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या व नंतर चौकशीनंतर अन्य दोघा आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून चोरीला गेलेले लोखंडी पाईप व 44 मीटर अल्युमिनियम तारेसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 35 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निलेश आत्माराम सपकाळे, लाला श्रीराम पवार व प्रताप रामू पवार (निंभोरा, ता.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे असून न्यायालयात त्यांना हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व तालुक्याचे निरीक्षक पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, रामकुमार मोरे, युनूस इब्राहीम शेख, प्रेमचंद सपकाळे, विठ्ठल फुसे व शिवाजी खंडारे आदींच्या पथकाने केली. दरम्यान, निरीक्षक कुंभार म्हणाले की, या गुन्ह्यात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार आहे.
