यावल पालिकेच्या सभेत विविध विषयांना सभागृहाची मंजुरी
यावल : नगरपालिकेची सर्वसाधारण सभा माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. त्यात शहर विकासाच्या 32 विषयांना मंजुरी देण्यात आली. मुख्याधिकारी यांच्यासह प्रत्येक विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
या विषयांना सभागृहाने दिली मान्यता
सभेत यावल नगरपालिकेच्या विस्तारीत भागातील नवीन पिण्याच्या टाकीवरून पाईप लाईन टाकण्याबाबत 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून तीन कोटी 65 लक्ष रुपये खर्च करण्यास सभेने मान्यता दिली, सानेगुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नवीन बेंचेस खरेदीकामी आलेल्या निविदेला मंजुरी देण्यात आली, विद्यालयात नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी देखील वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी देण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला त्याचप्रमाणे शहरातील प्रभाग क्रमांक आठ, महाजन गल्लीमधील विविध रस्त्यांच्या काँक्रीट कामांना मंजुरी देण्यात आली, काजीपुरा भागात मुस्लिम बांधवांसाठी समाज मंदिराच्या दुसरा मजला बांधण्याबाबतच्या कामासदेखील मंजुरी देण्यात आली. सभेत नगरसेवक शेख असलम, नगरसेविका रेखा चौधरी, नगरसेवक सय्यद युनूस यांनी स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित करून शहरात नियमित स्वच्छता होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. सभेसाठी मुख्याधिकारी बबन तडवी, कनिष्ठ अभियंता सईद शेख, योगेश मदने, रमाकांत मोरे, पंडित सावकारे, शिवानंद कानडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.



प्रभारी नगराध्यक्षांची अनुपस्थिती चर्चेची
आजच्या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे यावल नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते हे ऐनवेळी सभेत अनुपस्थित असल्याने नगरसेवक शेख असलम यांनी मुख्याधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे नगरपालिका अधिनियम 1965 च्या सभा कामकाज नियमानुसार नगराध्यक्ष सभेस उपस्थित नसल्यास त्यांच्याऐवजी उपाध्यक्ष यांनी सभेचे कामकाज चालवावे व अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघेही गैरहजर असल्यास उपस्थित सदस्यांपैकी एका सदस्यास सभाध्यक्ष म्हणून स्थान देण्यात यावे, असा नियम असल्याने सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांना नेमण्याची सूचना मांडण्यात आली तर त्यास नगरसेविका देवयानी महाजन यांनी अनुमोदन दिले व ते सभागृहाने सर्वानुमते ठराव केल्याने अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा कामकाजास सुरुवात करण्यात आली. गेल्या तीन वर्षापासून सतत विरोधी गटात राहिलेल्या अतुल पाटील यांना सभेच्या अध्यक्षस्थानी विराजमान होताना त्यांच्या गटातील सदस्यांनी आपण सत्तेत आल्याचा आनंद असल्याचे मत बैठक संपल्यानंतर व्यक्त केले.
