भुसावळ विभागात मराठा समाज संतप्त ः गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासह दोषी पोलिसांना बडतर्फ करण्याची मागणी
मराठा आंदोलकांवरील अमानुष लाठीहल्ल्याचा भुसावळ विभागात निषेध ः ठिकठिकाणी मोर्चा, ठिय्या आंदोलन
भुसावळ : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीहल्ला करीत रबराच्या गोळ्या चालवल्याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. भुसावळ विभागातील मराठा समाजबांधवांनी या घटनेचा निषेध नोंदवत सोमवारी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करीत निषेध नोंदवला. ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदन देत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली तर दोषी पोलीस अधिकार्यांसह कर्मचार्यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली.
यावल शहरात सकल मराठा समाजाचा मोर्चा

यावल : यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करीत सोमवारी मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयात मोर्चा आल्यानंतर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन देण्यात आले. निष्पाप मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेघार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने येथील यावल तालुका खरेदी विक्री संघापासून तर तहसील कार्यालयापर्यंत घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी तसेच दोषींवर कठोर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी घटनेची पार्श्वभूमी सांगत मराठा समाजाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणाच्या मागणीसाठी काढत असलेल्या मोर्चाचा इतिहास सांगितले. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील, प्रा.मुकेश येवले, पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परीषदेचे माजी गटनेते प्रभाकर सोनवणे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. आंदोलनात तालुक्यातील सकल मराठा समाजाचे गावोगावचे समाजबांधव, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते, यासह समाज हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरणगावात राज्य शासनाचा निषेध
वरणगाव : जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा वरणगाव शहरातील मराठा समाज बांधवानी बसस्थानक चौकात रस्ता रोको आंदोलन छेडून सरकारला काळे झेडें दाखवून निषेध करण्यात आला. बसस्थानक चौकात मराठा समाजबांधवांनी एकत्रीत एक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली व सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दीपक मराठे, मनोज देशमुख, योगेश पाटील, विरेंद्र देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, मिलिंद देशमुख, प्रशांत पाटील, शोभराज शेळके, एकनाथ कापसे, अनिल सोनवणे, नितीन बढे, संजय निंबाळकर, निलेश पाटील, सुनील देशमुख, प्रशांत मोरे, पंकज पाटील, अशोक पाटील, विलास गावंडे, गोपाळ गांवडे, कुलदीप देशमुख, मनोज देशमुख, मुक्तेश्वर सोनवणे, जालिंदर मराठे, अतुल मोहळ, रोहित चव्हाण, दीपक शेळके, योगेश बाऊस्कर, संतोष मराठे, शिवाजी पाटील आदी मराठा समाजाबांधव उपस्थित होते. उपनिरीक्षक परशुराम दळवी, हवालदार प्रशांत ठाकूर, मधुकर भालशंकर, मनोहर पाटील , राहुल येवले आदी पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला.

बोदवडला मलकापूर चौफुलीवर ठिय्या आंदोलन
बोदवड : निष्पाप मराठा आंदोलकांवर झालेल्या भ्याड लाठीहल्ल्याचा तीव्र शब्दात बोदवड येथे निषेध करण्यात आला. सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीपासून मराठा समाजाने मूक मोर्चा काढला. या मोर्चाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला तर मलकापूर चौफुलीवर मोर्चा आल्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून मोर्चा तहसीलदार कार्यालयाकडे निघाला. प्रभारी तहसीलदार मयुर कळसे याना निवेदन देण्यात आले. निवेदनात आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली तर समाजाचे हजारो तरुण आज बेरोजगार झाल्याने शेती संपुष्टात येत असल्याने त्यासाठी आरक्षण हाच मार्ग असून जालना जिल्ह्यातील अंतरावली गाव शांंत गाव असल्याने गृह विभागाने गावातील तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. शासनाने दखल न घेतल्यास भविष्यात मराठा समाज उग्र आंदोलन करेल, असे निवेदनात नमूद आहे. दरम्यान, या आंदोलनाला नगराध्यांसह सर्व नगरसेवक, भोले महाकाल फौंडेशन, हिंदू सूर्य महाराणा प्रताप उत्सव समिती, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आदींनी पाठिंबा दिला.
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : रोहिणी खडसे
मुक्ताईनगर : लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर तहसीलदारांना निवेदन देऊन घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. अॅड.खडसे यांनी गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी केली. सरकारने घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी तसेच शांतताप्रिय मार्गाने सुरू आसलेल्या आंदोलनावर बळाचा वापर करुन आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम सरकारने केल्याने या घटनेचा निषेध करीत असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, निवृत्ती पाटील, विलास धायडे, रामभाऊ पाटील, माणिक पाटील, गजानन पाटील, रवींद्र दांडगे, रऊफ खान, सम्राट पाटील, युवराज पाटील, प्रवीण पाटील, हरीष ससाणे, एजाज खान, दीपक साळुंखे, भरत अप्पा पाटील, डॉ.ए.एन.काजळे, प्रदीप बडगुजर, विजय चौधरी, मधुकर गोसावी, भूषण पाटील, राहुल पाटील, प्रदीप साळुंखे, निलेश भालेराव, भैय्या पाटील, आसीफ पेंटर, अय्याज पटेल, फिरोज सैय्यद, मुस्ताक मण्यार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदधिकारी उपस्थित होते.
भुसावळात आज लाक्षणिक आंदोलन
भुसावळ : लाठीमार प्रकरणाचा निषेध व मराठा समाजाला आरक्षणासाठी भुसावळ तालुका सकल मराठा समाजातर्फे मंगळवार, 5 सप्टेंबर जून्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करुन विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले जाईल. याबाबतचा निर्णय रविवारी सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणार्या मराठा समाजाच्या आंदोलनकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत आहे. या प्रकरणी राज्य शासनाचा निषेध व मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भुसावळ तालुका सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी सकाळी दहा वाजता जुन्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले जाईल. असा निर्णय सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्यांनी रविवारी झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी भुसावळ तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष रवी ढगे, संजय शिंदे, सुधाकर पवार, महेंद्र ठाकरे, रवींद्र लेकूरवाळे, सतीश ओगले, दिनानाथ ओगले, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, ज्ञानेश्वर जगदाळे, अॅड.प्रकाश मोझे, अॅड. प्रफुल्ल पाटील, अभिजीत मराठे, राजेंद्र पाटील आदींसह तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
