आधी एकनाथ खडसेंना संपवलं नंतर महाराष्ट्रात भाजपा संपवला : उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणविसांवर कणखर टिका
First ended Eknath Khadse then ended BJP in Maharashtra : Uddhav Thackeray’s strong criticism on Devendra Fadnavis जळगाव : देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा संपवला, नाथाभाऊला संपवलं. सफाचट केलं. सर्व उपरे घेतले. आयाराम घेतले. भाजप कार्यकर्त्यांच्या उरावर बसवले. सर्व आयाराम आहेत. अयोध्येत राम मंदिर बनवलं जात आहे, तसंच आयाराम मंदिर बनवणार आहेत. हे आयाराम लोकं आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपातील तुल्यबळ असलेल्या एकनाथ खडसेे यांचे राजकारण संपवण्यात आले आता महाराष्ट्रातील तुल्यबळ नेत्यांचे राजकारण संपवण्याचा घाट सुरू आहे. आयारामांची येथे भरती झाल्याचे ठाकरे म्हणाले. जळगावात महापुरूषांच्या पुतळा अनावरणानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.

आता मी ही टरबुज्यासारखा माणूस पाहतोच ; पाचवेळा केला टरबुज्या शब्दाचा प्रयोग
मुख्यमंत्र्यांना जी 20 परीषदेत जायला वेळ आहे मात्र जरांगे पाटलाला भेटायला वेळ नाही. जालन्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम यशस्वी करायचा असल्यानेच शांततेच्या मार्गाने चाललेल्या मराठा आंदोलकांवर गोळीबार, लाठीहल्ला करण्यात आला, असा दावा ठाकरेंनी केला. लाठीहल्ला करणारे पोलीसदेखील माणसे आहेत, त्यांच्यात राक्षस जन्माला येवू शकत नाही, पोलीसदेखील माणूस असून त्यांनी कोरोनात अनेकांचा जीव वाचवला आहे हे विसरून चालणार नाही. शांततेत चाललेल्या आंदोलनात पोलीस का घुसले ,
जालियनवाला कांड घडले तसे जालनावाला कांड घडले मात्र यास कोण जवाबदार आहे? असा प्रश्न जनतेतून त्यांनी विचारल्यानंतर टरबूज्या असा आवाज आल्यानंतर त्यांनी आपण या टरबूज्याला पाहिलेले नाही मात्र लवकरच पाहणार असल्याचे ते म्हणाले. तब्बल पाच वेळा टरबुज्या हा शब्द वापरून त्यांनी फडणविसांची खिल्ली उडवली.
तर आरक्षणाबाबतही घ्या ठोस निर्णय
सर्वोच्च न्यायालयाच्या वर संसद हा अधिकार तुम्ही जसा घेतला तसा आता आगामी खास अधिवेशनात मराठा, धनगर, ओबीसी समाजाला आरक्षण द्या, त्याबाबत ठोस निर्णय घ्या, याबाबतच्या निर्णयाला शिवसेना देशात पाठिंबा देणारा पहिला पक्ष असेल, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे मांडली.
तर हे पुन्हा गोध्रा घडवतील
आपल्या आक्रमक शैलीत ठाकरे यांनी राज्यातील सरकारसह केंद्र सरकारवर टिकेचे बाण चालवले. ते म्हणाले की, आगामी काळात जानेवारी महिन्यात अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन करण्याची तयारी सुरू आहे मात्र राजकारणासाठी हे देशातील लाखो हिंदूना अयोध्येत बोलावतील मात्र परतीच्या प्रवासात हे दंगली घडवतील कारण त्यानंतर त्यांना राजकीय पोळ्या शेकता येतील, असा आरोपही ठाकरेंनी केला.
