राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येते कुठून ? खासदार संजय राऊत
मुंबई (23 एप्रिल 2026) : मुंबईसह महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज कुठून येत आहे ? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलले पाहिजे असे उबाठाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
म्हणून सर्वांनाच क्लीन चीट
संजय राऊत म्हणाले की, शिखर बँक घोटाळ्यात जर सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट द्यायची असेल तर इतरांनी द्यावी लागेल म्हणून सर्वांनी क्लीन चीट देण्यात आली आहे. शिवसेना प्रकरणी कोर्ट आज कोणती तारीख देते हे बघावे लागेल. तर अमित शहा हे केवळ निवडणुकीपुरते पश्चिम बंगालमध्ये जातात. आम्ही अनेक वेळा तिथे जात असतो, तिथे काही वाद नाही. तिथली जनता आनंदी आहेत. भाजपने तिथली चिंता करू नये त्यांनी आसामची चिंता करावी.

अजित पवारांविषयी भावना व्यक्त करणारी निवडणूक
संजय राऊत म्हणाले की, बारामती निवडणूक ही भावनिक आहे. सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पण दुर्दैवाने निवडणूक बिनविरोध झाली नाही. प्रमुख पक्षाचे उमेदवार नसले तरी काही अपक्ष लोकं उभे आहेत. मविआकडून आमच्या नेत्या सुप्रिया सुळे या सांगता सभेला उपस्थित होत्या. शरद पवारांनी सुद्धा सोशल मिडीयाच्या माध्यमातून मतदानासाठी आवाहन केले आहे. सुनेत्रा पवारांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले आहे. अजित पवारांविषयी भावना व्यक्त करणारी ही निवडणूक आहे. राहुरीची निवडणूक सुद्धा महायुती आण्रि मविआमध्ये चांगली टक्कर होताना दिसत आहे.
निवडणूक आयोगाच्या ऑफीसवर भाजपचा झेंडा
संजय राऊत म्हणाले की, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या सारख्या राज्याच्या निवडणुकीत संविधान आणि लोकशाहीची प्रतिष्ठापणाला लागली आहे. भाजप त्यांचे मंत्री आणि निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे यंत्रणेचा वापर करत ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे त्याचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे. तरीही मला खात्री आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी चांगल्या बहुमताने सत्तेवर येतील. जनतेच्या हक्काच्या रक्षणासाठी आणि संविधानासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची असणार आहे. भाजप आणि केंद्र सरकारने पश्चिम बंगालमध्ये यंत्रणेला हाताशी धरत गुंडगिरी सुरू केली आहे. तिथे मतदार कमी आणि पोलिस जास्त झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या ऑफीसवर मला भाजपचा झेंडा दिसून येत आहे. तिथली जनता भाजपसोबत नाही तर ममता बॅनर्जी सोबत आहे तर तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांची सत्ता येईल. मुंबईत भाजपने खोटं बोलून मोर्चा काढला, ते महिलांची फसवणूक करीत असल्याचेही राऊत म्हणाले.

