तुझ्या कष्टाची साथ लाभते ; घरी सुख-समृद्धीची भरती येते

बैल पोळा सण उत्साहात : आमदार एकनाथ खडसेंसह रोहिणी खडसे व रवींद्र पाटील यांनी केले बैलांचे पूजन


मुकईनगर : शेतकर्‍यांच्या जीवाभावाचा मैतर असलेल्या बैल पोळा सणानिमित्त भुसावळ विभागात ठिकठिकाणी बैलांचे पूजन करण्यात आले तसेच गोडधोड पुरणपोळीचा नैवेद्यही खावू घालण्यात आला. ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींनीही गावी बैलांचे पूजन करीत शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येऊ, दे अशी प्रार्थना केली.

आमदार खडसेंनी केले पूजन
मुक्ताईनगर : बैल पोळा सणानिमित्त माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी कोथळी येथे बैलांचे पूजन केले तसेच बैलांना पुरण-पोळीचा नैवेद्य खाऊ घातला. शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येऊ, दे अशी प्रार्थना करण्यात आली. रोहिणी खडसे म्हणाल्या की, शेतकरी बांधव आपल्या शेतात राबून काळ्या आईची सेवा करून धान्य पिकवतात. त्यांना या कार्यात बैलांची मोलाची साथ लाभते. वर्षभर शेतात राबून घेत असलेल्या मेहनतीबद्दल वृषभ राजाचे ऋण व्यक्त करण्याचा, भुतदयेची शिकवण देणारा दिवस म्हणजे बैल पोळा. दरवर्षी आम्ही कोथळी येथे वृषभ राजाचे पूजन करतो.

अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी केले पूजन
बोदवड : शहरास तालुक्यात गुरुवारी बैल पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील मनुर बु.॥ आपल्या गावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील व पंजाबराव पाटील यांनी बैलांचे पूजन केले तसेच बैलांना यावेळी गोडधोड पुरणपोळी खावू घातली. एक महिन्याच्या विश्रातीनंतर पाच दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. कृषिप्रधान देशात पोळा सणाला विशेष महत्त्व आहे. बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागात सकाळीच बैलांना अंघोळ घालण्यात आली. नंतर दोर, नाथा, गेठा, घुंगरू, शेंदूर, रंग, झुल, बाशिंग लावून सजवण्यात आली पूजा केल्यानंतर गोडधोड घावू घालण्यात आली व दुपारी गावातून मिरवणूक काढण्यात आली.

राम मंदिर वॉर्ड, भुसावळ
भुसावळ : शहराचे आराध्य दैवत असलेले श्री राम मंदिर वार्डातील प्राचीन श्री बड़ा हनुमान मंदिरात बैलपोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील श्री बड़ा हनुमान मंदिरात गुरुवारी सकाळी पाच वाजेपासूनच भाविकांची नारळ फोडण्यासाठी गर्दी झाली. एकेकाळी बड़ा हनुमान मंदिरापासूनच पोळा फुटण्याची सुरुवात व्हायची. आजही बर्‍याच भाविकांचा हा नियम आहे की ते घरी जो नैवेद्य बनवतात तो आधी हनुमंताच्या चरणी अर्पण करतात त्यानंतर घरी जाऊन बैलांची पूजा करतात. ज्यांच्याकडे बैल जोडी आहे ते प्रामुख्याने बैलाला सजवल्यानंतर सर्वप्रथम हनुमंताच्या दर्शनाला आणतात. पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा आज श्री बड़ा हनुमान मंदिराजवळ बैलपोळा हा सण अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम बैल जोडी घेऊन येणारे शेतकरी बंधू संजय ठोके यांची बैलजोडी पहिल्या पूजेच्या मानाची जोडी ठरली. श्री बड़ा हनुमान मंदिराचे महंत प्रशांत रामदासजी वैष्णव, श्रीकृष्ण चोरवडकर, संतोष टाक, गोकुळ अग्रवाल, रविओम शर्मा, मेघा वैष्णव, मानसी नेवे, सोनम ठाकूर, भारती वैष्णव, विमल वैष्णव, नलिनी नेवे, प्रसाद भोंडे गुरुजी आदींनी बैल पूजेत सहभाग घेतला.

यावल शहरात पोळा सण उत्साहात
यावल : शहरात बळीराजाचा सोबती सर्जा-राजाचा सण पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कष्टकरी शेतकर्‍याच्या सोबत्याला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवुन, त्याचा श्रृंगार करून, ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढत बैलजोडीचा सन्मान करण्यात आला. शहरातील मोठा मारोती मंदीरात दर्शनाकरीता बैल जोड्यांची दिवसभर ये-जा सुरू होती. शहरात पोळा सणानिमित्त सकाळपासून सर्वत्र बैल जोडींच्या सजावटीत शेतकरी वर्ग मग्न होता व साडे दहा वाजेनंतर शहरातील मोठा मारोती मंदिरात बैल जोडीला दर्शनाकरीता आणण्यास सुरवात झाली. मारोतीला नारळ वाहून पोळा फुटला तसेच शहरातून बैल जोडींच्या सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !