जळगावात जुन्या वादातून दाम्पत्यावर हल्ला : दोघांना अटक
Attack on couple over old dispute in Jalgaon : Both arrested जळगाव : जुन्या भांडणाच्या वादातून शहरातील रचना कॉलनी पती व पत्नीला धारदार वस्तूने मारहाण करीत घरातील वस्तूंची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी सुनील रसाल राठोड उर्फ शेंड्या व विशाल पदमसिंह परदेशी उर्फ तांडव या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी रात्री 11 वाजता कांचन नगर परीसरातून अटक केली.
संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
गोपाल मधुकर चौधरी (48, दत्त मंदिराजवळ, रचना कॉलनी, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. बी.जे.मार्केट येथे लोटगाडीवर चिकन विक्रीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवार, 14 सप्टेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून शेंड्या उर्फ सुनील रसाळ राठोड, अनिल रसाळ राठोड (दोन्ही रा.कांचन नगर), तांडव उर्फ विशाल पदमसिंह परदेशी (कुसुंबा, जि.जळगाव) आणि एक अनोळखीने कोयत्याने मारहाण करीत गोपाल चौधरी यांना दुखापत केली तर त्यांच्या पत्नी यांना मारहाण करून घरातील सामानांची नासधूस करीत दुचाकीचेही नुकसान करीत जीव ठार मारण्याची धमकीही दिली.






याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी सुनील रसाल राठोड व विशाल पदमसिंह परदेशी यांना कांचन नगर परीसरातून अटक केली आहे.
दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या.सुवर्णा कुळकर्णी यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेंद्र उगले, छगन तायडे, सुधीर साळवे, इमरान सय्यद, ललित नारखेडे, किरण पाटील, सचिन पाटील यांनी केली. तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.


