गुजरातमेड बनावट खव्याची भुसावळात विक्री : त्रिकूटाविरोधात गुन्हा
पोलीस झाले फिर्यादी : जप्त खवा कोल्ड स्टोरेजमध्ये ; ‘त्या’ व्यापार्यांना नोटीस
Sale of fake Gujaratmade Khawa in Bhusawal : Crime against the trio भुसावळ : गुजरातमध्ये मेड साडेपाच टन वजनाचा व तब्बल 12 लाख रुपये किंमतीच्या बनावट खवा शुक्रवारी दुपारी भुसावळात जप्त करण्यात आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने ठोस भूमिका न घेतल्याने पोलिसच याप्रकरणात स्वतः फिर्यादी झाले आहेत. याप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या आयशर लक्झरी चालकासह क्लिनरविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली असून अन्न औषध प्रशासनाच्या ताब्यात दिलेला बनावट खवा जळगावातील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला आहे. बनावट खव्याची राज्यात विक्री करण्यासाठी मोठी टोळी कार्यरत असल्याने लवकरच साखळीतील म्होरक्यांवर कारवाईची दाट शक्यता खास सूत्रांनी वर्तवली.
असे आहे बनावट खवा प्रकरण
भुसावळ शहरातील बेकरी, स्वीटमार्ट तसेच हॉटेल्समध्ये विकल्या जाणार्या मिठाईसह माव्याच्या मोदकांमध्ये भेसळयुक्त खव्याचा वापर केला जात असल्याची माहिती भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना मिळाली होती शिवाय हा खवा गुजरातमधून शहरात दाखल होत असल्याची टीप मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार पथकाने शुक्रवारी दुपारी 12 वाजता नाहाटा चौफुलीवर गुजरातमधून आलेल्या एम.के.ट्रॅव्हल्स (जी.जे.01 ए.टी.1210) मधून खवा उतरवून तो आयशर (जी.जे.38 टी.ए.1800) मध्ये टाकला जात असताना छापेमारी करण्यात आली. पथकाने दोन्ही वाहने जप्त करीत उपअधीक्षक कार्यालयात आणल्यानंतर मोजणीत तब्बल 176 बॅगमध्ये पाच हजार 340 किलो वजनाचा व 11 लाख 74 हजार 800 रुपये किंमतीचा बनावट खवा आढळल्याने तो जप्त करण्यात आला होता.






बनावट खव्याची अहमदाबादमध्ये निर्मिती
पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींकडून जप्त केलेल्या खव्याची गोकुळ डेअरी (अहमदाबाद), रवी ट्रेडिंग कार्पोरेशन (अहमदाबाद), एस.आर.इंटरप्रायजेस (अहमदाबाद) व अंबिका दुध डेअरी प्रोडक्टस (अहमदाबाद) या ठिकाणी निर्मिती करण्यात आली व बनावट व भेसळयुक्त खवा मलकापूरसह अकोला येथे वाटपासाठी नेण्यात येणार होता. विशेष म्हणजे वाहनांवरील चालकांनीच जप्त केलेला खवा हा भेसळयुक्त व बनावट असल्याची कबुली दिल्याने आता म्होरक्यांवर लवकरच कारवाई शक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी रात्री अकोला, अमरावती भागातून आलेल्या पाच व्यापार्यांना नोटीसा बजावल्या असून संबंधितांकडे या बनावट खव्याची डिलेवरी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
अन्न व औषध प्रशासनाला याबाबत कळवूनही संबंधित विभागाने ठोस कारवाईची भूमिका न घेतल्याने पोलिस या प्रकरणात स्वतः फिर्यादी झाले आहेत. हवालदार सुरज पाटील यांच्या फिर्यादीवरून लक्झरी चालक कन्नूभाईजी गणेश पटेल (48, अंबिकानगर, नर्सरी साबरमती, अहमदाबाद), क्लीनर सुरेंदर कालू राजपूत (43, एम.के.बस सर्व्हिस, अहमदाबाद, गुजरात, मूळ रा.सराळा, जि.उदयपूर, राजस्थान) व आयशर चालक सैय्यद साबीर सैय्यद शब्बीर (35, अल्ला नगर, बैहरामपूरा, अहमदाबाद) यांच्याविरोधात भादंवि 272, 273, अन्न व सुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 50 व 51 अन्वये बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


