जातीवाचक शिविगाळ करून मारहाण : पडसोदच्या चौकडीविरोधात गुन्हा
Beating with caste abuse : Crime against Padsod quartet जळगाव : जळगाव तालुक्यातील पडसोद येथे गल्लीतून जाण्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाला जातीवाचक शिविगाळ करून लोखंडी सळईने डोक्यात मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील पडसोद गावात 30 वर्षीय तरुण परीवारासह वास्तव्याला आहे. रविवार, 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता तरुण त्यांच्या मामाच्या मुलासोबत जात असताना संशयित आरोपी दिलीप देवराम पाटील राहत असलेल्या गल्लीत दिलीप पाटील याने दोघांचा रस्ता अडवून जातीवाचक शिवीगाळ केली तसेच सोबत असलेले संजय तुकाराम पाटील, निलेश दिलीप पाटील, दिलीप देवराम पाटील (सर्व रा.पडसोद) यांनी मारहाण केली. यातील एकाने हातातील लोखंडी सळई तरुणाच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली.






हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री 11 वाजता संशयित आरोपी दिलीप देवराम पाटील, संजय तुकाराम पाटील, निलेश दिलीप पाटील, दिलीप देवराम पाटील (सर्व रा.पडसोद, ता.जि.जळगाव) याच्याविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत करीत आहे.


