हिंगोणा अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीची ग्वाही
पालकमंत्री गुलाबराव पाटील : मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन
जळगाव : यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ झालेल्या डंपर व क्रुझर गाडीच्या अपघातामध्ये चांगदेव, चिंचोल आणि निंबोलच्या 12 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सोमवारी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगदेव आणि चिंचोल येथे मृतांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. याप्रसंगी मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख रूपये मिळवून देण्याची घोषणा केली. पालकमंत्री व आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दुपारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घटनेची माहिती देत मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. तसेच याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आजच विभागीय आयुक्त कार्यालयास पाठविण्यात आला असल्याचे सांगितले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पालकमंत्र्यांसमवेत आमदार चंद्रकांत पाटील, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव, तहसीलदार शाम वाडकर, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, गटविकास अधिकारी सुभाष मावळे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांच्यासह गोपाळ सोनवणे, अफसर खान, दिलीप पाटील, चांगदेवचे माजी सरपंच पंकज कोळी, अतुल पाटील, संतोष कोळी, हारून शेख आदी उपस्थित होते.



