12 जणांचे बळी घेणारे हिंगोणा अपघातातील डंपर पेटवले


यावल : राखाड वाहणार्‍या भरधाव डंपरच्या धडकेत क्रुझरमधील 12 जण ठार सहा जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळील मोर धरण वसाहतीजवळ सोमवारी पहाटे एक वाजेच्या वाजेच्या सुमारास घडली होती. या भीषण अपघाताने चिंचोल, निंबोल व चांगदेव गावावर मोठी शोककळा पसरली असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या डंपरला आग लावल्याने खळबळ उडाली आहे. हा डंपर नेमका पेटवला कुणी? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

भीषण अपघातात 12 जणांचा गेला होता बळी
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोलचे रहिवासी प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी यांची कन्या मंजुश्रीचा 30 रोजी चोपडा पालिकेतील आरोग्य निरीक्षक व्ही.के.पाटील यांचे पूत्र प्रतीकशी थाटातविवाह समारंभ झाल्यानंतर रविवार, 2 रोजी चोपडा येथे वराकडील मंडळींनी स्वागत समारंभ (रीसेप्शन) ठेवल्याने तीन खाजगी वाहनांद्वारे चौधरी परीवारातील सदस्यांसह नातेवाईक चोपडा येथे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर विविध वाहनांद्वारे वर्‍हाडी गावाकडे येत असताना यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ राख घेवून जाणारा डंपर (एम.एच.40 डब्ल्यू 7558) ने कु्रझर (एम.एच.19 सी.व्ही.1772) ला जोरदार धडक दिल्याने क्रुझरमधील 12 जणांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीररीत्या जखमी झाले होते. या भीषण अपघातात मंगलाबाई ज्ञानेश्‍वर चौधरी (65), प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी (60), अश्‍लेषा उमेश चौधरी (28), रीया जितेंद्र चौधरी (14), प्रभाबाई प्रभाकर उर्फ बाळू चौधरी (40), सोनाली जितेंद्र चौधरी (34), प्रियंका नितीन चौधरी (28, सर्व रा.चिंचोल, ता.मुक्ताईनगर), सोनाली सचिन महाजन (34, चांगदेव, ता.मुक्ताईनगर), सुमनबाई श्रीराम पाटील (55) व संगीता मुकेश पाटील (40, दोन्ही रा.चिंचोल, ता.मुक्ताईनगर) यांचा जागीच मृत्यू झाला होता तर जखमींपैकी कु्रझर चालक धनराज गंभीर कोळी (चिंचोल, ता.मुक्ताईनगर) व शिवम प्रभाकर चौधरी (15, चिंचोल, ता.मुक्ताईनगर) यांचा सोमवारी सकाळी उपचार सुरू असतानाच मृत्यू ओढवला. दरम्यान, या अपघातात सर्वेश नितीन चौधरी (9, चिंचोल, ता.मुक्ताईनगर), आदिती मुकेश पाटील (निंबोल, ता.मुक्ताईनगर),सुनीता राजाराम पाटील (45, चिंचोल, ता.मुक्ताईनगर), मीना प्रफुल्ल चौधरी (30, चिंचोल, ता.मुक्ताईनगर) हे जखमी झाले होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !