गणपत्ती बाप्पा मोरय्या… पुढच्या वर्षी लवकर या…!
विघ्नहर्त्याला भुसावळ विभागात निरोप ; भुसावळात श्री विसर्जन शांततेत ; गुलालाऐवजी फुलांची उधळण
Ganapatti Bappa Moriya… come early next year…! भुसावळ : ढोल-ताशांसह डीजे व पारंपरीक वाद्यांच्या तालावर थिरकत तरुणाईने शहर व परीसरात विघ्नहर्त्या गणरायाला निरोप दिला. भुसावळात यंदा पोलीस प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे बंदोबस्ताचे नियोजन केल्याने निर्विघ्न गणेशोत्सव पार पडला तर रात्री 12 वाजेच्या आत श्री विसर्जन आटोपले. दरम्यान, पालिकेतर्फे निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली तर तापी पात्रात बॅरीकेटींग करण्यात आल्याने जीवरक्षकांमार्फत श्री विसर्जन करण्यात आल्याने कुठलीही अप्रिय घटना घडली नाही.
पुढच्या वर्षी लवकर या…!
गुलालाच्या दुष्पपरीणांबाबत पोलीस प्रशासनाने वारंवार आवाहन केल्यानंतर तरुणाईने ही बाब सकारात्मक घेत यंदा अत्यंत तुरळक प्रमाणात मिरवणुकीत गुलाल उधळला. आठवडे बाजारातील नृसिंह मंदिरापासून गुरुवारी दुपारी तीन वाजता मिरवणुकीला आमदार संजय सावकारे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी पूजन करताच सुरूवात झाली. मुख्य रांगेत 41 मंडळे सहभागी झाली तर ढोल-ताशांसह पारंपरीक वाद्यांसह डीजेच्या तालावर तरुणाईने थिरकत गणरायाला निरोप दिला. यंदा मिरवणुकीत महिलांसह-मुलींचा लक्षणीय सहभाग राहिला तसेच लेझीमही खेळण्यात आली. शहरातील तापी पात्रात लहान मूर्ती तर उंच मूर्तींचे हतनूर नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. भुसावळ शहरातील नागरीकांनी स्थापन केलेल्या सुमारे 30 हजारांहून अधिक मूर्तीचे तापी पात्रात विसर्जन करण्यात आले.
पालिकेचे अत्यंत काटेकोर नियोजन
विसर्जनासाठी येणार्या भाविकांची कुठलीही गैरसोय होवू नये यासाठी मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने व्यापक नियोजन केले होते. निर्माल्य संकलनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली तसेच तापी पात्रात जीवरक्षक नेमण्यात आल्याने कुठलीही अप्रिय घटना घडली नाही तसेच प्रखर उजेड देणारे दिवे, आरोग्य पथक व भाविकांसाठी नदीपात्रात मुरूम टाकण्यात आल्याने भाविकांना गैरसोयींचा सामना करावा लागला नाही. रात्री मिरवणूक आटोपल्यानंतर मिरवणूक मार्ग मध्यरात्रीतून स्वच्छ करण्यात आला.
निर्मल ‘दातृत्वा’ची भाविकांना प्रचिती
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी श्री विसर्जनासाठी जाणार्या सुमारे 20 हजाराहून अधिक भाविकांसाठी साईजीवनतर्फे कढी-खिचडी, केळी आदी फराळाचे वितरण केले. भाविकांसाठी दोन हजार किलोची खिचडी, 800 किलो दह्यापासून बनविलेली कढी व 30 हजार केळीचे वितरण करण्यात आले.
रोटरी आणि ईनरव्हील रेलसिटीने केला महादेव घाट स्वच्छ
श्री विसर्जनादरम्यान तापी काठी श्री मूर्तीचे काही भाग, नारळाच्या कुंच्या, केळीचे खांब, प्रसाद, अर्धवट जळालेल्या वाती व उदबत्ती, पूजेचे सामान, निर्माल्य पडून शुक्रवारी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी व ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या सदस्यांनी भुसावळातील तापी नदीवरील महादेव घाट स्वच्छ केला. जवळपास शंभर मीटर परीसरात स्वच्छता करण्यात आली. आपणही समाजाचं देणं लागतो या भावनेतील खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न केल्याचे ईनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रेवती मांडे यांनी याप्रसंगी सांगितले. यशस्वीतेसाठी रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष मनोज सोनार, सचिव तेजस नवगाळे, विकास पाचपांडे, चेतन पाटील, सोनू मांडे, प्रवीण वारके, रणजीत खरारे तर ईनरव्हील क्लबच्या अध्यक्ष रेवती मांडे, सचिव सीमा सोनार, सुनीता पाचपांडे, जयश्री चौधरी यांनी परीश्रम घेतले.

