भुसावळात जीम ट्रेनरची या कारणातून झाली हत्या ; तीन संशयित ताब्यात

साडेतीन लाख रुपयांचा वाद बेतला जीवावर : गुन्हेगारी पुन्हा ऐरणीवर


A gym trainer was killed in Bhusawal for this reason ; Three suspects in custody भुसावळ : मामीला मुलीच्या लग्नासाठी दिलेले साडेतीन लाख रुपये परत मागितल्याच्या वादातून शहरातील जीम ट्रेनर असलेल्या 31 वर्षीय तरुणाची तलवार व चाकूचे वार करीत हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरातील केशव नगराजवळ घडली. या घटनेत नाजीश शेख नासीर (31, आझाद नगर, सिद्धेश्वर मंदिराजवळ, खडका रोड, भुसावळ) या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी महिलेसह तिघांविरोधात बाजारपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, भुसावळातील गुन्हेगारी पुन्हा ऐरणीवर आली आहे. एक महिन्यांपूर्वीच कंडारी येथे पूर्ववैमनस्यातून भावंडांसह दोघांची हत्या करण्यात आली होती तर त्यानंतर काही तासात कुविख्यात निखील राजपूतची कौटूंंबिक वादातून शालकानेच निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर पुन्हा महिनाभराच्या अंतरात शहरात रविवारी जीम ट्रेनची हत्या करण्यात आल्याने भुसावळ शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली असून गुन्हेगारी पुन्हा ऐरणीवर आली आहे.

उधारीचा वाद बेतला तरुणाच्या जीवावर
भुसावळ शहरातील खडका रोड परीसरातील आझाद नगरात नाजीश शेख नासीर (31, आझाद नगर, सिद्धेश्वर मंदिराजवळ, खडका रोड, भुसावळ) हा तरुण आई-वडिल, भाऊ व पत्नी, मुलांसोबत वास्तव्याला होता. नात्याने मामी असलेल्या सुलतानाबी मुबारक खान (स्वामी विवेकानंद शाळेजवळ, केशव नगर, भुसावळ) यांच्या मुलीच्या लग्नासाठी त्याने साडेतीन लाख रुपये दिले होते व हे पैसे परत मागितल्यानंतर सुलतानाबी यांचा नाजीशसोबत शनिवारी रात्री 11 वाजता जोरदार वाद झाला व या वादात महिलेच्या भावासह भाच्याने उडी घेत धमकी दिली होती. ही बाब घरी आल्यानंतर नाजीशने आई शर्मिला नासीर यांना सांगितली होती.

जीम उघडायला जात असताना केला हल्ला
रविवारी नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता नाजीश शेख नासीर (31) हा स्वामी विवेकानंद स्कूलजवळील माहीर फिटनेस नामक जीम उघडण्यासाठी घरातून बाहेर पडला असता संशयित सुलतानाबी हिच्या घराजवळ दबा धरून असलेल्या संशयित आरोपी व महिलेचा भाऊ ईझहार उर्फ अज्जू जलालोद्दीन शेख (आझाद नगर, भुसावळ) व भाचा आसीफ दाऊद शेख (आझाद नगर, भुसावळ) यांनी तलवारीसह चाकूचे सपासप वार करीत हल्ला चढवल्याने नाजीश रक्ताच्या थारोळ्यात पडला. पोटावर, पाठीवर तसेच हातावर शस्त्रांचे धाव वर्मी लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला तर हल्ला होत असताना शर्मिला नासीर यांनी धाव घेतल्यानंतर आरडा-ओरड केल्याने हल्लेखोर पसार झाले. यावेळी जखमी अवस्थेतील नाजीश याला जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

तिघांविरोधात खुनाचा गुन्हा
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे , बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाच्या खून प्रकरणी शर्मिला शेख नासीर (48, आझाद नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून सुलतानाबी मुबारक खान (स्वामी विवेकानंद शाळेजवळ, केशव नगर, भुसावळ), ईझहार उर्फ अज्जू जलालोद्दीन शेख व आसीफ दाऊद शेख (दोन्ही रा.आझाद नगर, भुसावळ) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर शोकुकुल वातावरणात मयत तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !