गोरगरीबांच्या रेशन मालाची काळ्या बाजारात तस्करी : धरणगावातील निलेश वाणीसह तिघांविरोधात गुन्हा

पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई : ट्रक चालकासह क्लिनरला अटक


Smuggling of ration goods of the poor in the black market : A case against Nilesh Vani and three others from Dharangaon नशिराबाद : धरणगाव येथून गोंदिया येथील राईस मिलमध्ये ट्रकद्वारा जाणारा सुमारे आठ लाख रुपये किंमतीचा रेशनचा तांदुळ नशिराबाद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पकडल्याने रेशन तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात ट्रक चालक धनराज रामदास सोनवणे (43) व स्वप्नील संजय सोनवणे (20, दोन्ही भुसावळ रोड, श्रीराम नगर, मुक्ताईनगर) व निलेश वाणी (धरणगाव, जि.जळगाव) व संबंधितांविरोधात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील रेशन मालाची तस्करी करणारे मोठे रॅकेट कार्यरत असून पोलिसांनी या रॅकेटचा बीमोड करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना धरणगावातून रेशन मालाची साठवणूक केलेला तांदूळ गोंदिया येथे जात असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारवाईचे निर्देश दिल्यानंतर भुसावळ पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे हवालदार सुरज पाटील यांनी ट्रक (एम.एच.18 बी.झेड.1039) चा पाठलाग केल्यानंतर नशिराबादपासून काही अंतरावरील गोदावरी महाविद्यालयाजवळ भुसावळच्या दिशेने निघालेला ट्रक अडवल्यानंतर चालकाला वाहनातील मालाबाबत विचारणा केली मात्र संबंधित समाधानकारक उत्तर देत नसल्याने संशय बळावल्यानंतर पिंगळे यांना माहिती कळवण्यात आली व त्यानंतर नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक रामकृष्ण मोताळे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंगळवारी रात्री 11 वाजता पथकाने ट्रकची पाहणी केल्यानंतर त्यात रेशनचा तांदूळ असल्याचे स्पष्ट होताच ट्रक नशिराबाद पोलिस ठाण्यात आणण्यात आला.



तिघांविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी ट्रक चालक धनराज रामदास सोनवणे (43) व स्वप्नील संजय सोनवणे (20, दोन्ही भुसावळ रोड, श्रीराम नगर, मुक्ताईनगर) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची विचारपूस केली असता त्यांनी 29.5 टन तांदूळ हा धरणगाव येथील रेणुका माता ट्रेडींग यार्डातून भरल्याचे सांगून निलेश वाणी यांच्या सांगण्यानुसार 550 गोण्यांमधील हा तांदूळ गोंदिया येथील जय बामलेश्वरी सार्टेक्स येथे नेत असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी ट्रकमधील तांदळाची मोजणी केल्यानंतर त्यात 29.5 टन वजनाचा व बाजारभावानुसार सुमारे आठ लाख रुपये किंमतीचा तांदुळ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अन्न व पुरवठा अधिकार्‍यांना माहिती कळवल्यानंतर अधिकार्‍यांनी पंचनामा केला. बुधवारी सायंकाळी उशिरा ट्रक चालकासह क्लीनर व निलेश वाणी तसेच संबंधितांविरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 प्रमाणे हवालदार सुरज पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात रेशन माल काळ्या बाजारात नेणारी टोळी मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून भुसावळातही तिची पाळेमुळे असल्याने कारवाईची अपेक्षा आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !