मुदत संपलेल्या परवान्यासह कालबाह्य डंपरातून राखाड वाहतूक
राज्य मार्ग पोलिस अधीक्षकांच्या पाहणीत अनेक बाबी उघड
यावल : हिंगोणा अपघातात 12 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकाकडील वाहन परवान्याची मुदत संपल्यानंतरही त्याच परवान्याआधारे ते वाहन चालवत असल्याची व डंपरचीदेखील मुदत कालबाह्य झाली असताना त्यातून राखाड वाहतूक होत असल्याची मंगळवारी अपघातस्थळी भेट दिलेल्या रस्ते राज्य मार्ग पोलिस अधीक्षक डॉ.डिगंबर प्रधान (ठाणे-मुंबई) व राज्य मार्ग पोलिस उपअधीक्षक नजीर शेख यांच्या पाहणीदरम्यान उघड झाली. अधिकार्यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी हिंगोणा गावाजवळ झालेल्या अपघातस्थळासह अपघाताला कारणीभूत ठरलेल्या डंपरची पाहणी केली तसेच फैजपूर पोलिसांना काही सूचनाही केल्याचे सांगण्यात आले.
अधिकार्यांनी जाणून घेतली माहिती
राज्य महामार्ग विभागाचे पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक तसेच धुळे निरीक्षक सुनील बच्छाव, सहाय्यक निरीक्षक सुनील मेढे, कर्मचारी पारधी, अफजल तडवी, गिरीश शिंदे, दत्तात्रय घाळवे यांनी मंगळवारी दुपारी अपघातस्थळासह अपघातग्रस्त वाहनांची पाहणी केली.



वाहन परवान्याची मुदतही संपली
सूत्रांच्या माहितीनुसार, 12 जणांचे बळी घेणारा डंपर चालक मुकुंदा भंगाळे (डांभूर्णी) यांच्या वाहन परवान्याची मुदत यापूर्वीच संपली आहे शिवाय डंपर कालबाह्य असून 2019 मध्येच त्याची मुदत संपली आहे मात्र असे असतानाही नियम धाब्यावर बसवून राखेची वाहतूक होत असल्याने दोषींवर कठोर कारवाईची करण्याची मागणी पुढे आली आहे.
