जागेसाठी रेल्वेतून झुला फेकला, युपीचा प्रवासी भुसावळातील यंत्रणेच्या जाळ्यात अडकला

अपघात टळला : ‘कर्नाटक’मधून फेकलेला झुला ‘पुष्पक’च्या इंजिनावर आदळला


Swinging from the train for space, the UP passenger got caught in the system’s net in Bhusawal भुसावळ : डाऊन कर्नाटक एक्स्प्रेसच्या विकलांग डब्यातील प्रवाशाने जागेसाठी चक्क लहान मुलांचा झुला (पाळणा) धावत्या एक्स्प्रेसमधून बाहेर फेकला मात्र हा झुला त्याचवेळी जाणार्‍या अप पुष्पक एक्स्प्रेसच्या इंजिनाला धडकला. इंजिनावर काहीतरी टणक वस्तू आदळल्याची बाब लोकोपायलटने ही नियंत्रण कक्षाला कळवताच यंत्रणा अलर्ट झाली. भुसावळात रेल्वे सुरक्षा बलाच्या पाच पथकांनी कर्नाटक एक्स्प्रेस येताच संबंधित प्रवाशाचा शोध धेवून त्याला बेड्या ठोकल्या. संशयित प्रवाशाला चाळीसगाव रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पवन कुमार मुन्ना कुमार (26, सूबेदारपूर, टिकर, तहसील हस्वा, जि.फतेहपूर, उत्तर प्रदेश) असे अटकेतील प्रवाशाचे नाव आहे. दरम्यान, सुदैवाने फेकलेला झुला एखाद्या प्रवाशाला लागला नाही अन्यथा प्राणहानी होण्याचीदेखील भीती होती.

असे आहे नेमके प्रकरण
संशयित प्रवासी पवन कुमार मुन्ना कुमार हा सोमवारी अहमदनगरहून कानपूर जाण्यासाठी डाऊन 12627 कर्नाटक एक्सप्रेसच्या विकलांग डब्यातून प्रवास करीत होता. या डब्यात अज्ञात प्रवाशाचा झुला (पाळणा) राहून गेल्याने पवनकुमार याने चाळीसगावजवळील किलोमीटर क्रमांक 308 जवळ हा झुला फेकून दिला व त्याचवेळी अप पुष्पक मुंबईच्या दिशेने जात असताना झुल्याचा फटका रेल्वेच्या इंजिनाला बसला. टणक वस्तू आपटल्याचा आवाज झाल्यानंतर लोको पायलटने ही बाब नियंत्रण कक्षाला कळवली. अप्रिय घटना टाळण्याच्या हेतूने भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाने डाऊन कर्नाटकच्या लोकोपायलटशी संपर्क साधून नेमका प्रकार जाणून घेतला.





भुसावळ येताच प्रवाशाला बेड्या
भुसावळ डीआरएम ईती पांडे व मंडल सुरक्षा आयुक्त एच.श्रीनिवास राव यांना ही बाब कळवल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर.के.मीना, निरीक्षक बैनी प्रसाद मीना यांच्या नेतृत्वात भुसावळ रेल्वे स्थानकावर पाच पथक रेल्वे स्थानकावर सज्ज ठेवण्यात आले. डाऊन कर्नाटक एक्स्प्रेस सायंकाळी सव्वा पाच वाजता येताच रेल्वे इंजिनाजवळील डब्यांमधील प्रवाशांशी चर्चा केल्यानंतर लाल रंगाचा टी शर्ट घातलेल्या प्रवाशाने धावत्या रेल्वेतून झुला फेकल्याची बाब समोर येताच त्याचा शोध घेण्यात आला व विकलांग डब्यातून त्यास ताब्यात घेण्यात आले. विकलांग डब्यात झुल्यामुळे बसण्यास अडचण येत असल्याने हा झुला फेकल्याची प्रवाशाने कबुली दिली. संशयित प्रवाशाविरोधात रेल्वे अ‍ॅक्ट 153 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली व चाळीसगाव रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात देण्यात आले.

मोठी हानी टळली ; सतर्कतेचे आवाहन
धावत्या रेल्वेतून फेकलेला झुला सुदैवाने अप पुष्पकमधील कुठल्याही दरवाजात बसलेल्या प्रवाशाला लागला नाही अन्यथा प्रवासी खाली पडण्याची व प्राणहानी होण्याची भीती होती. रेल्वे प्रवाशांनी प्रवासादरम्यान अशा प्रकारे कुठलीही हरकत करू नये, असे आवाहन रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे. अशा प्रकारे गुन्हा करणार्‍या प्रवाशांविरोधात रेल्वे अ‍ॅक्ट 153 अन्वये गुन्हा दाखल होवून पाच वर्ष शिक्षेची तरतूद आहे शिवाय 154 अन्वये एक वषापर्यंत कारावास व दंडाची तरतूद असल्याचे रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक आर.के.मीना यांनी कळवले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !