यावल शहरात डेंग्यूचा शिरकाव
नगरपालिका व तालुका आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची मागणी.
Dengue outbreak in Yaval city यावल : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून डास व मच्छर यांचा उपद्रव वाढला आहे. शहरातील विविध भागात डेंग्यू व मलेरीया रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये रुग्ण उपचार घेत असून नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पालिका प्रशासन व तालुका आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करण्याबाबत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी प्रशासनाला पत्र देऊन मागणी केली आहे.
मोकळ्या जागांवर साचले तळे व डबके
यावल शहरात विविध भागात गेल्या काही दिवसांपासून डास व मच्छर यांचा उपद्रव वाढला आहे. शहरातील रुग्णालयात डेंग्यू व मलेरीया आजारांचे रुग्ण उपचार घेत असल्याचे चित्र आहे. शहराच्या विविध भागांत मोकळ्या जागेवर पाण्याचे व गटारीचे डबके साचलेले आहे शिवाय त्यावरील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे एडीस इजिप्ती नावाच्या डेंग्यू आजाराच्या अळ्या तयार होत आहे. या अळ्यांमुळे डासांची उत्पत्ती होत असून शहरातील नागरीक डेंग्यू व मलेरीया या आजारांमुळे बाधीत होत आहे. यावल नगरपालिकेने तालुका आरोग्य विभाग यांची मदत घेऊन घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करावे व ज्या भागांत मोकळ्या जागेत डबके साचलेले असतील ते ठिकाण माती टाकून बुजुन नष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावल शहरातील प्रत्येक भागात जाऊन कानाकोपर्यात जाऊन धुरळणी फवारणी करावी व गटारीवर बीएससी पावडर मारावी तसेच नगरपालिकेने पथक तयार करून तालुका आरोग्य विभाग यांना सोबत घेऊन घरोघरी रुग्णांची तपासणी करून सर्व्हेक्षण करावे व रूग्णांवर शासकीय इस्पितळात उपचार करून मोफत औषधी उपचार करावेत, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे


