घोडगावच्या तरुणाने नैराश्येतून स्वतःलाच जिवंत जाळले

लुटल्याच्या बनावाने यंत्रणेवर वाढला ताण : उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू


चोपडा : घोडगावातील 30 वर्षीय अविवाहित तरुणाने आलेल्या नैराश्यातून स्वतःलाच पेट्रोल टाकून जाळले मात्र चोरट्यांनी पेट्रोल टाकून जाळल्याचा बनाव केल्याने यंत्रणेवर चांगलाच ताण वाढला मात्र जवाबातील तफावत व सीसीटीव्ही फुटेज आधारे पोलिसांनी सत्यता उजेडात आणल्यानंतर तरुणाने स्वतःलाच जाळल्याचे समोर आले. भूषण दिलीप पाटील (30 रा.घोडगाव), असे मयताचे नाव आहे.

लुटल्याचा केला बनाव
चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे भूषण पाटील हा अविवाहित तरुण वास्तव्यास होता. शेती काम करुन तो आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. 11 रोजी तो चोपडा येथे आला होता. परंतु सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही. सायंकाळच्या सुमारास बाटलीत पेट्रोल घेवून तो धरणगाव रस्त्यावरील पाटचारीजवळ आला. बुधवारी रात्रीच्या सुमारास त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत जाळून घेतले. काही क्षणातच भूषण पुर्णपणे भाजला गेल्याने त्याने अंगाची होणारी लाहीलाही कमी होण्यासाठी शेजारीच असलेल्या पाटचारीच्या पाण्यात उडी घेतली आणि रात्रभर तो पाटचारीतील पाण्यातच बसून राहिला. गुरुवारी सकाळच्या सुमारास पाटचारीजवळून जाणार्‍या एका व्यक्तीचा मोबाईलवरुन भूषण नातेवाईकांसोबत संपर्क साधत त्यांना घटनेची माहिती दिली. यावेळी त्याने आपल्याला चोरट्यांनी माझ्याकडील रक्कम लूटून घेत पेट्रोल टाकून जाळून टाकल्याचे सांगितले. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या भूषणला तात्काळ चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

पोलिस अधीक्षकांनी दिल्या तपासाच्या सूचना !
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, चोपडा शह पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासह एलसीबीच्या पथकाने धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पथकाला या घटनेचा उलगडा करण्यासाठी तपासाबाबत सूचना दिल्या.

चोरट्यांनी आपल्याला पेट्रोल टाकून पेटवल्याचा रचला बनाव !
जखमी भूषणची चौकशी केली असता, त्याने आपण घराकडे जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी आपला मोबाईल चोरुन नेला असे सांगितले. त्यानंतर तेच चोरटे पुन्हा भेटले त्यांनी भूषणला दुचाकीवरुन घेवून जात त्याला पाटचारीजवळ नेले. याठिकाणी त्याला मारहाण करीत त्याच्याकडे असलेली रोकड हिसकावून घेतली. त्यानंतर चोरट्यांनी आपल्याला पेट्रोल टाकून जाळून टाकल्याचे भूषणने पोलिसांना सांगत पोलिसांची दिशाभूल केली.

व्हिडिओ कॉलवरुन संशयितांना ओळखले !
पुर्णपणे भाजलेल्या अवस्थेत असलेल्या भूषणने सांगितलेल्या वर्णनानुसार एलसीबीसह चोपडा पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, रुग्णालयात असलेल्या भूषणला त्यांनी व्हीडीओ कॉलद्वारे संशयितांना दाखविले असता, त्याने यांनीच आपल्याला जाळल्याचे सांगितले होते.

सीसीटीव्ही फुटेजमूळे खरी माहिती आली समोर !
सुरुवातीला भूषणने तो दिवसभरत फिरलेल्या ठिकाणांची त्याने माहिती दिली. यात त्याने आपल्याला भावाने पाठविलेले पैसे काढण्यासाठी बँकेत गेलो, त्यानंतर एटीएममध्ये देखील गेलो असे सांगितले. पोलिसांनी हॉटेल, स्टेट बँक, एटीएम व पेट्रोलपंप याठिकाणावरील फुटेज ताब्यात घेतले. यापैकी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तो स्वतः च बाटलीत पेट्रोल घेत असल्याचे कैद झाल्याचे दिसून येताच त्याने स्वतःच पेटून घेतल्याची खात्री पोलिसांना झाल्यानंतर संपुर्ण घटनेचा उलगडा झाला.

अन् पोलिसांनी सोडला सुटकेचा निःश्वास
जिल्हा रुग्णालयात गंभीर अवस्थेत असलेल्या भूषणची पोलीस चौकशी करत होते. त्यावेळी तो पोलिसांना घटनेबाबत वेगवेगळे जबाब देत होता. परंतु त्याच्या जबाबातील तफावतीमुळे पोलिसांना देखील या घटनेबाबत थेट निष्कर्ष काढू शकत नव्हते. अखेर पोलिसांनी भूषणला सहानुभूती आणि विश्वास घेत त्याची पुन्हा चौकशी केली. यामध्ये त्याने पोलिसांना सत्य हकीकत सांगत आपणच स्वतःला जाळून घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे भूषणने मृत्यूपूर्वी दिलेल्या कबुली जबाबामुळे पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !