यावल रस्त्याची भूमिपूजनानंतरही उपेक्षाच


वरातीमागून घोडे : आधी भूमिपूजन नंतर पाईपलाईन काढण्यास आली जाग : खड्ड्यांनी जर्जर भुसावळाकरांना न्यायाची अपेक्षा

भुसावळ : शहरातील सर्वाधिक दुरवस्था झालेल्या यावल रस्त्याचे डांबरीकरण कामाचे रींग रोड अंतर्गत मंजूर झालेल्या कामातून होणार होते. त्यासाठी गुरुवार, 23 जानेवारी रोजी आमदार व नगराध्यक्षांच्या उपस्थितीत रस्ता कामाचे भूमिपूजन करण्यात आले व त्यावेळी पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याची ग्वाहीदेखील ठेकेदाराकडून देण्यात आली मात्र पंधरा दिवस उलटूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने वाहनधारकांसह नागरीकांमधून सत्ताधारी व लोकप्रतिनिधींविषयी प्रचंड रोष व्यक्त होत आहे. किरकोळ अपघात या रस्त्यावर नित्याचे झाले असून अप्रिय घटना घडण्यापूर्वीच दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पंधरा दिवसानंतरही निघाली नाही पाईप लाईन
शहरासाठी मंजूर असलेल्या अमृत योजनेसाठी तापी नदीवर बंधारा बांधून तेथून पाण्याची उचल करण्याचे यापूर्वी नियोजन होते मात्र शेळगाव बंधार्‍याच्या बॅक वॉटरमुळे तापी नदीत बंधारा बांधणे शक्य नसल्याने एमजीपने साकेगाव-जोगलखोरी शिवारातील शेळगावच्या मृतसाठ्यात जॅकवेलचे आता नियोजन केल्याने यावल रस्त्यावर टाकण्यात आलेली मेन रायझिंग काढण्याची बाब रस्ता कामाच्या भूमिपूजनाप्रसंगी लक्षात आल्याने आधी पाईप लाईन काढावी व नंतरच रस्ता कामाला सुरूवात करण्याची भूमिका ठेकेदाराने मांडली मात्र गेल्या पंधरा दिवसानंतरही हे काम पूर्ण न झाल्याने नागरीक व वाहनधारक संतप्त झाले आहेत.




खड्डेमय रस्त्यातून मुक्ती मिळण्याची अपेक्षा
शहरातील यावलरोड, जळगाव रोड, जामनेर रोड, खडकारोड आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गाला खड्ड्यांनी व्यापल्याने शहरातील दुचाकीस्वारांना पाठदुखीची शिक्षा नाहक भोगावी लागत आहे. मुख्य रस्त्यांप्रमाणेच नगराध्यक्ष रमण भोळे यांचा काच बंगला परीसर, सतारे भाग, भोईनगर आदी भागांतील रस्त्यांवरुन चालणेही कठीण झाले आहे. तर जामनेर रोडवरील स्थितीही विदारक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि खडकारोडची स्थिती सारखीच असून शहरातील रस्त्यांपेक्षा शेत रस्ते बरे, अशी स्थिती आहे. दरम्यान, शहरातील मुख्य रस्त्यांच्या ट्रिमिक्स काँक्रीटीकरणासाठी पालिकेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 15 कोटी रुपयांचे विशेष रस्ता अनुदान दिले होते मात्र अमृत योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत रस्त्यांची कामे करू नये, असे निर्देश असतानाच 12 कोटींचा वेळेत खर्च न झाल्याने परत गेल्याने हा निधी पूर्ववत आणण्यासाठी लोकप्रतिनिधींचा प्रयत्न सुरू आहे. तसे झाल्यानंतर अन्य रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लागण्याची आशा आहे.

एकाच मार्गामुळे अपघाताची भीती
यावल रोडवरील वन विभागाच्या नाक्याजवळ एक ते दोन फुटांचे खड्डे पडल्याने वाहनधारकांना विरुद्ध दिशेने वाहने चालवावी लागत असून त्यामुळे अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे शिवाय मेन रायझिंग काढण्याचे काम गेल्या पंधरा दिवसानंतरही पूर्ण झाले नसतानाच काढण्यात आलेले पाईप रस्त्यावर टाकण्यात आल्याने आहे तो रस्ता अत्यंत विदारक झाल्याने वाहनधारक एकाच बाजूने जाण्या-येण्यासाठी उपयोग करीत असल्याने अवजड वाहनांमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. अप्रिय घटना घडल्यास जवाबदार कोण? असा प्रश्‍नही आता उपस्थित होत आहे. जळगाव रोडवरील गांधी पुतळा ते कोणार्क हॉस्पीटलपर्यंतच्या मार्गही खडतर झाला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !