सरकारचा निर्णय अमान्य : मनोज जरांगे पाटील
जालना : अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. संबंधित अधिकार्याने ते वाटूसुद्धा नये, तुम्हाला ते वाटू दिले जाणार नाहीत. उद्याच्या उद्या सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत, अशी मागणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मंगळवारी मंत्री मंडळ बैठकीत न्यायमूर्ती शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकारण्यात आला. कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यास मंत्रिमंडळात मंजुरी दिली मात्र जरांगे-पाटील यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
सरकारला कडक इशारा : तर तुम्हाला मराठे काय आहेत हे कळेल !
माध्यमाशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत. सरकारने विशेष अधिवेशन बोलावून यासंदर्भात निर्णय घ्यावा, अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. रात्रीपर्यंत निर्णय घ्या अन्यथा मी जलत्याग करेन, असा इशारा त्यांनी देत तर तुम्हाला मराठे काय आहेत हे देखील कळेल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

तर जशास तसे उत्तर
ते म्हणाले की, मराठा तरुणावर खोटे गुन्हे दाखल करू नका, महाराष्ट्र शांत आहे, सरकारचे लोक गोंधळ घालत आहेत. तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी स्वत: बीडमध्ये जाऊन एसपी, जिल्हाधिकार्यांसमोर बसेन. त्यावेळी पाच लाख येतील, अथवा 10 लाख आंदोलक येतील, मला त्याची काळजी नाही. मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास जशासतसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.









