भुसावळात 400 दुचाकींची विक्री ; सुवर्ण बाजाराला ‘झळाळी’
बाजाराला पावली ‘दिवाळी’ : कोट्यवधींची उलाढाल : शहरातील रस्ते गर्दीने फुलले
Sale of 400 bikes in Bhusawal; The gold market is in turmoil. भुसावळ : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी सणातील धनत्रयोदशी सणाचा मुहूर्त साधत शहरात सोने, कपडे, दुचाकी, चारचाकी तसेच अन्य चैनींच्या वस्तू खरेदीच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल झाली. शहरातील बाजारपेठेत शुक्रवारी पाय ठेवायलादेखील जागा नव्हती. सोन्याचे दर प्रति ग्रॅम 6080 वर आल्याने सोन्याच्या बाजारपेठेतही लाखोंची उलाढाल झाली. सोन्याचे नाणे, हिर्यांचे दागिणे तसेच लक्ष्मी मूर्तीची ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. शहरात साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या धनत्रयोदशीला विविध कंपन्यांचे चारशे बाईकची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले तर पाच नव्या कारही शहरातील रस्त्यावर धावल्या.
बाजाराला पावली ‘दिवाळी’
प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळी पर्वात बाजारात मोठ्या प्रमाणावर विविधांगी वस्तूंची खरेदी ग्राहकांकडून केली जात असल्याने विक्रेत्यांनीदेखील ही संधी कॅश केली. या माध्यमातून शुक्रवारी शहरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे चित्र होते. केरसुणी, पणती, फटाके यासोबत दुचाकी, चारचाकी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने व सोने विक्रीच्या माध्यमातून शहरातील कोट्यवधींची उलाढाल झाली. शुक्रवारी धनत्रयोदशी, रविवारी लक्ष्मी पूजन असल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. बाजारात केरसुणी, साळीच्या लाह्या, बत्ताशे विक्रेते, पूजेसाठी लागणारी पाच फळे, रांगोळ्या, लक्ष्मीची पावले, लक्ष्मीची मूर्ती, कपडे खरेदी, साड्या, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करण्यात आली.






इलेक्ट्रॉनिक्स उत्पादंना मोठी मागणी
शहरात ग्राहकांकडून टिव्ही, फ्रिज, डीश वॉशर, वॉशिंग मशीन आदी साहित्याचीदेखील मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. रेल्वे कामगारांना अलीकडेच बोनस मिळाल्यानंतर तसेच विविध कंपन्यांकडून विविध आकर्षक सुट दिल्या जात असल्याने ग्राहकांनी विविध वस्तूंना पसंती दिल्याने या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल झाली. शहरातील ई बाईकच्या शोरूममध्ये सुमारे 25 हून अधिक वाहनांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले.
केरसुणीला मागणी ; झेंडू भाव खावून
दिवाळीत केरसुणीलादेखील तितकेच महत्व असून बाजारात 200 पेक्षा जास्त केरसुणी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. 40 रुपये दराप्रमाणे केरसुणीची विक्री झाली. झेंडूच्या फुलांनादेखील मोठीं मागणी असून 50 ते 60 रुपये किलो दराने त्यांची विक्री करण्यात आली. रविवारी फुलांची मागणी वाढणार असून जिल्ह्यासह मराठवाड्यातून विक्रेते शहरात दाखल झाले आहेत.


