भुसावळात पोलिसांनी गावठी शस्त्र तस्करीचा डाव उधळला : दोन कट्ट्यांसह संशयित जाळ्यात
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई : स्थानिक शस्त्र विक्रेत्याचे अंधारात पलायन
Bhusawal Police foil village arms smuggling plot : Suspect nabbed with two sticks भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी पिस्टल खरेदी करणार्या छत्रपती संभाजी नगरातील संशयिताला बेड्या ठोकत त्याच्याकडून 60 हजार रुपये किंमतीचे दोन पिस्टल जप्त केले आहेत तर शस्त्र विक्री करणारा भुसावळातील संशयित मात्र पसार झाला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एम.ओ.एच.कॉलनी परीसरातील हॉटेल मधूबनजवळ करण्यात आली. योगेश नंदू सांगळे (29, छत्रपती संभाजीनगर) या शस्त्र खरेदी करणार्यास अटक करण्यात आली तर बंटी उर्फ पवन झरापकर (भुसावळ) हा संशयित अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
बाजारपेठ पोलिसांना शस्त्र तस्कराबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. एम.ओ.एच.कॉलनी परीसरातील कच्चा रोडच्या बाजूला असलेल्या हॉटेल मधूबनजवळ संशयित योगेश सांगळे हा स्कॉर्पिओतून आल्यानंतर संशयित झरापकर हा दुचाकीवरून आला व त्याने आपल्याजवळील दोन गावठी कट्टे सांगळे यास दिल्यानंतर सापळा रचून असलेल्या सांगळे यास ताब्यात घेतले तर झरापकर हा अंधाराचा फायदा घेत पसार झाला.


संशयिताला एका दिवसाची कोठडी
पोलिसांनी 60 हजार रुपये किंमतीचे दोन पिस्टल, चार लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ (एम.एच.14 बी.के.9094), 40 हजार रुपये किंमतीची होंडा ग्लॅमर (एम.एच.19 बी.एल.1944) व दिड हजारांची रोकड मिळून पाच लाख एक हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. कॉन्स्टेबल सागर वंजारी यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयिताला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यास एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
तपास हवालदार निलेश चौधरी करीत आहेत. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार निलेश चौधरी, विजय नेरकर, सागर वंजारी, सचिन पोळ आदींच्या पथकाने केली.
