पिंप्राळा शिवारात बकर्या चारणार्या तरुणावर बिबट्याचा हल्ला : तरुण गंभीर
Leopard attack on youth grazing goats in Pimprala Shiwar : Youth critical मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा शिवारात बकर्या चारणार्या 32 वर्षीय तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने तरुण जखमी झाला तर तरुणाने आरडा-ओरड केल्यानंतर परीसरातील शेतकर्यांनी धाव घेताच बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाला कुर्हा येथे हलवल्यानंतर प्राथमिक उपचार करण्यात आले व त्यानंतर मुक्ताईनगर व तेथून जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
बकर्या चारताना अचानक हल्ला
गणेश गणपत झाल्टे (32) हा तरुण नेहमीप्रमाणे कंपार्टमेंट नं. 574 वनविभागाच्या हद्दी जवळील शेत गट नं.162 मध्ये बकर्या चारत असताना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक मागून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी गणेश झाल्टे याने आरडाओरड केल्याने लगतच्या शेतातील अजाबराव झाल्टे व इतर शेतकर्यांनी धाव घेत बिबट्याला पिटाळून लावल्याने त्याने जंगलाकडे धूम ठोकली.


तरुणाची प्रकृती गंभीर
बिबट्याच्या हल्ल्यात जख्मी झालेला तरुण गणेश झाल्टे यास अजाबराव झाल्टे, पिंप्राळा पोलिस पाटील महादेव झाल्टे, सरपंच रामचंद्र कोळी व नातेवाईकांनी तत्काळ कुर्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले. वनविभागाचे वनपाल पाचपांडे, गवळी, मराठे, वनरक्षक डी.एम.धूळगुंडे, ए.एस.मोरे, एस.एस.गोसावी यांनी कुर्हा येथून मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारार्थ हलविले. प्रकृती गंभीर असल्याने गणेश झाल्टे यास प्राथमिक उपचारानंतर तातडीने जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्रभारी वनक्षेत्रपाल दत्तात्रय लोडे यांनी जखमीची भेट घेत घडलेला प्रकार जाणून घेतला.





