मालेगावातील कुविख्यात पाकिटमार भुसावळ तालुका पोलिसांच्या जाळ्यात

मनोज जरांगेच्या ताफ्यात शिरून दाखवली ‘हात की सफाई’ ; खान्देशात शेकडो चोर्‍या केल्याचा संशय


Notorious Pakitmar in Malegaon in the net of Bhusawal Taluka Police भुसावळ  : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी खान्देशच्या दौर्‍यावर आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यात शिरून गर्दी दिसताच ‘हात की सफाई’ करणार्‍या मालेगावातील कुविख्यात गँगला भुसावळ तालुका पोलिसांनी अत्यंत सतर्कता बाळगून बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या शेकडो चोर्‍या उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे अट्टल आरोपींनी आपले वाहन मनोज-जरांगेंसोबत चालणार्‍या वाहनांच्या ताफ्यात टाकल्याने कुणालाही या टोळीचा संशय आला नाही. कुर्‍हेपानाचे गावात झालेल्या जबरी लूटनंतर पोलिसांना धागेदोरे गवसले अन् पारोळ्यातील नाकाबंदीत कुविख्यात टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

या आरोपींना पडल्या बेड्या
अबूबकर कबुतर मोहम्मद उस्मान (घर नंबर 50, गट क्रमांक 41, मालदा शिवार, मालेगाव), नदीम अख्तर अहमद (घर क्रमांक 100, गल्ली क्रमांक दोन, आझादनगर, मालेगाव), अबरार अहमद मोहम्मद रऊफ (अहमदिया मशिदीसमोर, अयूब नगर, गुरुवारपेठ, मालेगाव), हमीद अली मोहम्मद उमर (रोशनबाद, मालेगाव), बखद दाऊद हवा अब्दुल रहेमान (प्लॉट क्रमांक 48, अकस्त कॉलनीजवळ, मालेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.



कुर्‍ह्यात जबरी लूट अन गवसला धागा
जामनेर येथून भुसावळकडे येत असलेले मनोज जरांगे-पाटील यांचे कुर्‍हेपानाचे गावात सोमवार, 4 रोजी दुपारी 12.30 वाता मराठा बांधवांनी स्वागत केले. यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत राजू रूपचंद चौधरी (53, कुर्‍हेपानाचे, ता.भुसावळ) यांच्या खिशातून पाकिट चोरी होत असताना चौधरी यांच्या लक्षात आले. त्यांनी वळून पाहिल्यानंतर पाच संशयित त्यांच्यामागे गराडा घालून उभे होते व त्यातील दोघे बळजबरीने पाकिट काढत असताना चौधरी यांनी त्यास विरोध करताच दोघांनी त्यांचे हात धरले तर अन्य तिघांनी त्यांच्या खिशातून बळजबरीने पाकिट काढून घेतले व या पाकिटात 15 हजार 500 रुपयांची रोकड होती. आरोपींनी तक्रारदाराला पोलिसा तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली मात्र त्यांनी न डगमगता भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे दीपक जाधव यांना प्रकार सांगितला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजद्वारे एक संशयिताची छबी निष्पन्न झाली.

अलर्ट खबरे व नाकाबंदीत आरोपी जाळ्यात
कुर्‍हेपानाचे येथे झालेल्या लुटीनंतर एक संशयित निष्पन्न झाला व तक्रारदाराने संशयित हे एका कारने पसार झाल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी जिल्हाभरात अलर्ट दिला. नशिराबादसह एरंडोल व पारोळा येथे नाकाबांदी लावण्यात आली मात्र चोरट्यांनी नशिराबाद पोलिसांना चकवा देत पारोळा गाठले मात्र येथल्या नाकाबंदीत ते अलगद अडकले.

शंभरावर चोर्‍या उघडकीस येण्याची आशा
पारोळानजीक पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनात लावलेल्या नाकाबंदीत चोरटे चारचाकी (एम.एच.18 ए.जे.6633) मध्ये आल्यानंतर सतर्क यंत्रणेने त्यांना ताब्यात घेत भुसावळ तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्यांच्या ताब्यातून एक लाख 79 हजारांची रोकड, पाच मोबाईल तसेच चारचाकी जप्त करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी मनोज-जरांगेंच्या जामनेरसह कुर्‍हेपानाचे, भुसावळ, वरणगाव, मुक्ताईनगरातील सभेत पाकिटमारी केली तसेच खान्देशात झालेल्या जरांगे-पाटलांच्या सभेत त्यांनी पाकिटमारी केल्याचा संशय आहे. पोलिस कोठडीचा हक्क राखून आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे, हवालदार दीपक जाधव, प्रेमचंद सपकाळे, हवालदार युनूस शेख, हवालदार विठ्ठल फुसे, हवालदार संजय तायडे, काझी मेझर आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !