विहिरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू : रावेरी शिवारातील घटना
Leopard dies after falling into a well : incident in Ravery Shivar सोयगाव : .सोयगाव जवळील रावेरी शिवारात शेतातील विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. मृत बिबट्या कुजलेल्या अवस्थेत विहिरीत आढळून आल्याने तो तीन ते चार दिवसांपासून हा बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज आहे.
शिकारीच्या शोधात विहिरीत पडल्याचा अंदाज
रावेरी शिवारातील शेतात विहिरीत बिबट्या कुजलेल्या अवस्थेत असल्याची वार्ता रावेरी, कंकराळा गावात वार्यासारखी पसरताच वनविभाग खडबडून जागे झाला मात्र वनविभागाच्या पथकाला घटनास्थळ शोध घेऊनही सापडले नव्हते. अखेरीस ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाला दुपारी उशिरा तीन वाजता घटनास्थळ सापडल्यावर ग्रामस्थांच्या मदतीने तीन तास रेस्क्यू मोहिम राबवून कुजलेला बिबटया पाच वाजता विहिरी बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.


शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार
वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रवीण कोळी, वनरक्षक नागरगोजे, वनरक्षक सुनील चेके, नगरे वनमजूर यांनी रेस्कु मोहिम हाती घेतली. अजिंठा वरून पशुधन विकास अधिकारी डॉ.अभिशेख खडसे यांना मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले व रात्री उशिरा घटनास्थळीच मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून वनविभागाने अंत्यसंस्कार केले.
