जळगावातील तरुणाच्या खुनामागे समोर आले हे धक्कादायक कारण…!
The shocking reason behind the murder of a young man in Jalgaon has come to light…! जळगाव : जळगावच्या समता नगरातील अरुण बळीराम सोनवणे (28, रा.समता नगर जळगाव) या तरुणाचा समता नगराजवळील वंजारी टेकडीवर निर्घृण खून करण्यात आला होता. या खुनामागे आरोपी पिंट्या शिरसाठ याच्या पुतणीचा विवाह अरुण सोनवणे सोबत निश्चित झाला होता मात्र यास विरोध होता शिवाय त्यांच्या जुना वाद असल्याने त्यातून ही हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पाच संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पाच आरोपींच्या हल्ल्यात आशिष संजय सोनवणे आणि गोकुळ बळीराम सोनवणे हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
टेकडीवर बोलावत केला हल्ला
रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील समता नगर परीसरातील वंजारी टेकडीवर वाद मिटवण्यासाठी अरुण सोनवणे व आशिष सोनवणे यांना बोलावण्यात आले होते. यावेळी संशयितांनी चॉपरने हल्ला केल्याने अरुण सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला तर मित्र आशिश सोनवणे गंभीर जखमी झाला. भाऊ वंजारी टेकडीवर गेल्याची माहिती मिळाल्यानंतर गोकुळ बळीराम सोनवणे हादेखील गेला मात्र त्याच्यावरही संशयितांनी हल्ला केल्याने तोदेखील जखमी झाला.


पाच संशयितांविरोधात गुन्हा
तरुणाच्या खून प्रकरणी गोकुळ बळीराम सोनवणे (31, समतानगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयित सोनू आढाळे, पप्पू आढाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड आणि योद्धा उर्फ पिंट्या शिरसाठ अशा पाच जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात खून व प्राणघातक हल्ला या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित पसार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. तपास सहा.पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत.
