महानुभाव साहित्यातही आढळल्या कुणबी-पाटील-मर्हाटा नोंदी
Kunbi-Patil-Maratha records also found in Mahanubhava literature खिर्डी : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभरात आंदोलन करण्यात आले तर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनीदेखील आंतरवाली सराटी येथे नुकतेच आंदोलन करीत सरकारला अल्टीमेटमही दिला. त्यानंतर शासकीय दप्तरांमध्ये मराठा-कुणबी-पाटील नोंदी शोधण्यात आल्या. दरम्यान, महानुभाव साहित्यातही कुणबी-पाटील-मर्हाटा नोंदी असल्याचा दावा महानुभाव संप्रदायाचे संशोधक योगेश मुरारीमल शेवलीकर यांनी केला आहे.
लीळाचरित्रात सर्वच विषयांची नोंद
महाराष्ट्राचा सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व भौगोलिक वारसा ज्या साहित्याने आजपर्यंत जतन केला त्या साहित्यामध्ये शीर्षस्थानी असलेले साहित्य म्हणून महानुभाव साहित्याचा उल्लेख मध्ययुगीन मराठी वाङ्मयात आवर्जून केला जातो. यादवकालीन महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव या साहित्यातून यथार्थपणे अभिव्यक्त होताना दिसून येते. महाराष्ट्राच्या जडण-घडणीचा सत्यान्वेषी धांडोळा घ्यावयाचा असेल तर सर्वात प्राचिन दस्तऐवज म्हणून महानुभाव साहित्याची विश्वासार्हता निःसंदेह मान्य करावी लागेल हे आजवरच्या सर्वच मराठी अभ्यासकांनी, साक्षेपी संशोधकांनी, भाषा तज्ञांनी नोंदवीलेले मत आहे. हे साहित्यिक मूल्य महानुभाव साहित्याला प्राप्त झाले आहे. लीळाचरित्र हे मराठी साहित्याचे पहिले आपत्य आणि धवळे ही मराठी सारस्वताची पहिली काव्य कन्या ठरते. महानुभाव पंडीतांनी साडेपाच हजार ग्रंथांची निर्मिती केली. या सर्व ग्रंथांचा मूलभूत आधार लीळाचरित्र आहे. लीळाचरित्र म्हणजे मराठी सारस्वताचा अथांग महासागर आहे. महासागरामध्ये शिंपल्यापासून अनर्घ रत्नापर्यंत प्राप्ती होते तसे या लीळाचरित्र ग्रंथामध्ये ओवी, चौपदी, फागडा इत्यादी स्फुट लेखनापासून ते बालकथा, अख्यायिका, दृष्टांत, सूत्र, सामाजिक, धार्मिक, राजकीय, ऐतिहासिक इत्यादी विषयांपासून तत्त्वज्ञानापर्यंत सर्व विषयाची नोंद सापडते, असेही शेवलीकर यांनी कळवले आहे.







