एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक ; तत्पूर्वी इंडिया आघाडीचा चेहरा ठरवण्याची आवश्यकता
Lok Sabha elections in April ; The need to decide the face of the India front before that नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुका एप्रिल वा मे महिन्यात होण्याची शक्यता असून त्यापूर्वीच इंडिया आघाडीचा निमंत्रक वा चेहरा ठरवावा लागणार आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परीषदेत दिली. तुमच्या नावावर सर्वांचं एकमत झालं तर इंडिया आघाडीचं नेतृत्व करणार का, असा प्रश्नही विचारल्यानंतर ठाकरे म्हणाले की, उगाच काही तारे तोडण्याची गरज नाही. सगळ्यांशी बोलू आणि चर्चा करू.
बैठकीत मांडणार सूचना
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावर आजच्या बैठकीत चर्चा होईल. डिसेंबर महिना अर्धा संपला आहे. आता लवकरच निवडणुकीचं वर्ष सुरू होईल. वेळापत्रकाप्रमाणे एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होईल. या निवडणुकीच्या तयारीला आता सर्वांनी लागण्याची गरज आहे. बाकीच्यांच्या ज्या सूचना असतील त्यावर आमचं काय मत आहे, आमच्या काही सूचना आहेत, त्या आजच्या बैठकीत मांडल्या जातील, अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली.





देश वाचवण्यासाठी आम्ही एकत्र
पाटणा इथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समर्थकांनी लावलेल्या पोस्टर्सची चर्चा आहे. पाटण्यात लावलेल्या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे की, जर खरंच विजय हवा असेल तर एक निश्चय पाहिजे, एक नितीश पाहिजे. या पोस्टरवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही जे लोक एकत्रित आलो आहोत, त्यातील कोणाच्याही डोक्यात नेतृत्वाची हवा भरलेली नाही. आम्ही देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. काल खासदारांचं निलंबन झालं, सभागृहातील चित्रही आपण पाहिलं. त्यामुळे देशातील लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही लोकशाही जिवंत ठेवली तर देश जगेल आणि ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.