जनता उघड्या डोळ्यांनी दडपशाही पाहत आहे ; सरकारला याची किंमत मोजावी लागेल : शरद पवारांची मोदी सरकारवर टिका


नवी दिल्ली : संसदेतील घुसखोरीच्या मुद्यावर गदारोळ करणार्‍या 144 खासदारांवर निलंबन करण्यात आल्याने विरोधकांनी या कृतीविषयी संताप व्यक्त केला आहे. निलंबित खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. या संदर्भात विरोधी पक्षांनी दिल्लीत सरकार विरोधात मोर्चा काढला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला असून जनता उघड्या डोळ्यांनी दडपशाही पाहत असून सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असे शरद पवार म्हणाले आहेत.

सरकारला याची किंमत मोजावी लागेल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, सरकार विरोधकांकडे दुर्लक्ष करून कारभार करण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील जनता सर्वकाही पाहत आहे. याची सरकारला जबरदस्त किंमत मोजावी लागेल. संसदेत जे लोक संसदेत घुसले होते, ते संसद सदस्य नव्हते. ते सभागृहात कसे आले? त्यांना पास कुणी दिला? यावर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. विरोधकांनी याविषयीची मागणी केली होती. सरकाने त्यावर स्पष्टीकरण देणे अपेक्षित होते. पण सरकारने कोणतेही उत्तर दिले नाही. उलट यासंबंधी चर्चेच्या मागणीचा आग्रह धरणार्‍या खासदारांचे निलंबन केले. संसदेत असे यापूर्वी केव्हाच घडले नव्हते.






मिमिक्री करणे गैर नाही
शरद पवार यांनी यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची सभागृहाबाहेर एका खासदाराने केलेल्या मिमिक्रीत काहीही गैर नसल्याचेही स्पष्ट केले. हा प्रकार सभागृहाबाहेर घडला होता. तो सभागृहात नेण्याची गरज नव्हती. विशेषतः या प्रकरणी जात काढण्याचीही गरज नव्हती. उद्या माझ्याविरोधात काही झाले, तर मी मराठा व शेतकरी असल्यामुळे हा या दोघांचाही अवमान आहे असे म्हटले तर ते योग्य ठरणार नाही, असे पवार म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !