पवन एक्स्प्रेसमधून दोन कोटींच्या रोकडसह आरोपी जाळ्यात
रेल्वे सुरक्षा बलाची प्रशंसनीय कामगिरी : अपहारातील पैसा नेताना कारवाई
मुंबई : पवन एक्स्प्रेसमधून अपहारातील तब्बल दोन कोटींची रोकड नेणार्या दोघा आरोपींच्या भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाने खंडव्यानजीक मुसक्या आवळल्या आहेत. आतापर्यंतची ही रेल्वे सुरक्षा बलाची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. विनोद झा व अमित यादव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मुंबई क्राईम ब्रँचने भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे एएससी व डीएससी यांना अपहार प्रकरणातील दोन संशयीत दोन कोटींच्या रोकडसह पवन एक्स्प्रेसने जात असल्याची माहिती दिली होती. त्यावरून डीएससी क्षितीज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गाडीतील आरपीएफच्या गस्तीपथकाला संशयीतांच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले तर खंडवा आरपीएफला कारवाईबाबत सूचित करण्यात आल्यानंतर गाडी खंडवा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर आरोपींच्या मुसक्या आळवण्यात आल्या. आरोपींच्या ताब्यातून तब्बल दोन कोटींची रोकड जप्त करण्यात आली. दरम्यान, आरोपींनी ही रोकड कुठून लांबवली व ते कुठे जात होते? याची अद्याप माहिती उपलब्ध होवू शकलेली नाही.



