भुसावळात गॅस दरवाढीचा निषेध


भुसावळ राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे तहसीलबाहेर चूल पेटवून सरकारचा निषेध : भाकरी थापून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न : तर केंद्राची सत्ता जनता खेचल्याशिवाय राहणार नाही

भुसावळ : विना अनुदानीत सिलिंडरच्या दरात सरकारने तब्बल 145 रुपयांची विक्रमी वाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याच्या निषेधार्थ गुरुवारी भुसावळ तहसील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला काँग्रेसतर्फे सिलिंडरला हार घालत चुलीवर थाकरी थापत चहा करून सरकारचा निषेध करण्यात आला. तातडीने सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी अन्यथा जनता केंद्र सरकारला खुर्चीच्या खाली ओढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला. या संदर्भात तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

तहसीलवर मोर्चा आणत केंद्र सरकारचा निषेध
राष्ट्रवादी महिला काँगे्रस शहराध्यक्षा नंदा निकम यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी महिलांनी तहसील कार्यालयावर थेट मोर्चा आणला. तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच नंदा निकम यांच्यासह महिलांनी तीन दगडांच्या तीन ठीकाणी चुली मांडत तेथे भाकरी थापल्या तसेच चहादेखील केला. यावेळी सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणावर केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच निषेधार्थ आणलेले घोषणाफलक झळकावले. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे भारताच्या विकास दर कमी कमी होत असून या दरवाढीमुळे सर्व सामान्य भरडला जात आहे. केंद्र सरकारने केलेली ही दरवाढ ही तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, सरकारने गरीबाचे हिताचे निर्णय घ्यावे, अशी मागणी महिला वर्गातून प्रसंगी करण्यात आली.



तहसीलदारांना निवेदन
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, शहराध्यक्ष नंदा प्रकाश निकम, कार्याध्यक्ष मिनल पाटील, मिनाक्षि चव्हाण, जयश्री पाटील, अर्चाना कदम, ममता तडवी, शकीला तडवी, शोभा भोईटे, आशा अंभोरे, आशा चावरिया, कमल पाटील, पिनाझ फनीबंदा, ताराबाई मोची, सुनंदा बगाडे यांच्यासह प्रकाश निकम व नागरीकांच्या उपस्थितीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

पोलिस प्रशासनाची आंदोलनस्थळी धाव
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, प्रमोद पाटील, चंद्रशेखर गाडगीळ यांनी तत्काळ तहसील कार्यालयाजवळ दाखल होत रस्त्यावर पेटविलेली चूल बंद करण्यास सांगितले. प्रसगी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. पोलिस घटनास्थळापर्यत आले तोपर्यत भाकर्‍या व चहाही तयार झाला. या अनोख्या आंदोलनाची मात्र शहरात दिवसभर चर्चा होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !