यावलकरांना दिलासा : हद्दवाढीच्या भागातील पाईप लाईनला मंजुरी
तीन कोटी 65 लक्ष रुपयातून होणार काम : जिल्हाधिकार्यांकडून दखल
यावल : यावल नगरपालिकेच्या हद्दवाढ झालेल्या भागातील पाईपलाईन साठी तीन कोटी 65 लक्ष रुपयांच्या कामास जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी मंजुरी दिली असून त्यामुळे विस्तारीत भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने नागरीकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
नगरसेवक अतुल पाटील यांचा पाठपुरावा
यावल नगरपरीषदेने विस्तारीत भागासाठी यापूर्वी दहा लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधकाम पूर्ण झालेले असून जलशुद्धीकरण केंद्रापासून ते पाण्याची टाकी पर्यंतचे पाईपलाईनचे (मेन रायझिंग) कामदेखील गेल्यावर्षी पूर्ण झालेले होते मात्र पाण्याची टाकी पासून ते विस्तारित भागातील विविध कॉलनी यासाठी वितरण व्यवस्थेचे पाईपलाईन टाकण्याचे गरजेचे होते. सदरील काम करण्यात यावे यासाठी यावल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी प्रत्येक सभेमध्ये या विषयाचा पाठपुरावा केला होता त्यानुसार नगरपरीषदेने सदर कामाची मंजुरी 14 वित्त आयोग या योजनेतून करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जळगाव यांचेकडून तांत्रिक मंजुरी घेऊन जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविला होता त्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिल्याने विस्तारित भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला असून नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामाचे निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यात येऊन कामस सुरुवात करणार असल्याचे अतुल पाटील यांनी सांगितले.


विस्तारीरत भागातील पाणीप्रश्न कायमचा मिटणार -अतुल पाटील
यावल नगरपालिकेची हद्दवाढ 2010 मध्ये करण्यात आली होती तेव्हापासून तर आतापर्यंत या भागातील नागरी नगरपालिकेला कर भरणा करून सहकार्य करीत होते मात्र विस्तारीत भागातील 75 टक्के नागरीकांना अद्यापपर्यंत नगरपालिकेचे पाणी मिळत नव्हते म्हणून मी नगराध्यक्ष असताना या भागासाठी नवीन पाण्याची टाकी तसेच फिल्टरपासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतची पाईप लाईन असे एकूण एक कोटी 91 लक्ष रुपयाचे काम मंजूर करून काम पूर्ण करण्यात आले होते आता मात्र वितरण व्यवस्थेची पाईपलाईन मंजूर झाल्याने या भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे विस्तारीत भागासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा व्हावा हे माझे स्वप्न पूर्ण होणार असल्याचा मला आनंद आहे.
