आचार संहिता लागताच भुसावळात प्रशासन अॅक्शन मोडवर : खाजगी, सार्वजनिक जागांवरील झेंडे, बॅनर काढले
As soon as the code of conduct comes, administration in Bhusawal on action mode : Flags, banners removed from private and public places भुसावळ : लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास लागू होताच राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, फलक काढण्यास सुरूवात करण्यात आली. 72 तासात खासगी जागांवरील झेंडे, बॅनर काढा आणि आदर्श आचार संहितेचे पालन करा, अश्या सूचना प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी अधिकार्यांच्या बैठकीत दिल्यात.
विभागप्रमुखांच्या बैठकीत सूचना
लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता शनिवारी लागणार असल्याने प्रांताधिकारी पाटील यांनी शुक्रवारी संध्याकाळी सातलाच सर्व विभाग प्रमुख सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत आचार संहितेचे पालन करण्याबाबत त्यांनी सूचना केल्यात. आचारसंहिता लागल्याने आता निवडणुकीच्या कामाला वेग आला आहे. यामुळे प्रत्येक अधिकार्यांनी त्यांना नेमून दिलेले काम चोखपणे पार पाडायचे आहे. यासाठी प्रत्येक अधिकार्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जाऊन त्यांच्या मतदान केद्रांची त्या केद्रांच्या आवारात कुठे राजकीय पक्षाचे पोस्टर, फोटो, झेंडे, बॅनर लावले आहे का याची पाहणी करा, ते असल्यास तत्काळ काढून टाका, पालिकेच्या सूचना करा, पोस्टर, चित्र, झेंडा कुठे चिकटवला आहे. याची माहिती पालिका प्रशासनाला द्या, जेणे करून ते काढून टाकले जातील. पहिल्या 24 तासात शासकीय कार्यालयावर लावण्यात आलेले फलक झाकून टाका नाही तर काढून टाका, प्रत्येक अधिकार्यांनी त्याच्या कार्यालयावर अथवा इमारतीच्या परिसरात झेंडे लावले आहे का याची पाहणी करावी, 48 तासात सार्वजनिक जागेवरील झेंडे, बॅनर, फलक, पक्षाचे चिन्ह काढून घ्यावे, आणि 72 तासात खाजगी जागावरील आचार संहितेचा भंग होणार असेल असे काही आक्षेपार्ह असल्यास ते काढून घ्यावे, राजकीय पक्षांतर्फे कुणी ऐकून घेत नसल्यास आदर्श आचार संहितेचा भंग झाला म्हणून संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल करावा, टेलिफोनचे खांब, इलेक्ट्रीकचे खांब, दुभाजकात लावलेले चित्रे काढून टाकावी, अश्या सूचना प्रांत जितेंद्र पाटील व निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर यांनी दिल्यात.



पालिकेचे पथक सक्रीय
आचार संहिता लागू होताच पालिकेचे 50 कर्मचार्यांचे पथक शहरातील विविध भागात पथके फिरत आहे, यावल रोड, जळगाव रोड, लोखंडी पूल या भागात पथकाने फिरत सुमारे 100 पेक्षा जास्त झेंडे, 18 पेक्षा जास्त पोस्टर, चित्रे काढली तर राजकीय पक्षाच्या कोनशिला, विकासकामांच्या फलकांवर कागद चिकटविले. उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, अनिल भाकरे, गोपाळ पाली राजू चौधरी आदींचा त्यात सहभाग होता.





