माळेगावातून अवजड वाहतुकीला ग्रामस्थांचा विरोध
Villagers oppose heavy traffic from Malegaon मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील ब्रिटिशकालीन तलावातून भागपूर उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी गाळ वाहतूक ही माळेगावमार्गे करण्यास स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन विरोध केला आहे.
अप्रिय घटना घडण्याची भीती
जळगाव तालुक्यातील भागपूर उपसा सिंचन योजनेसाठी गाळ उत्खनन सुरू आहे. माळेगावमार्गे अवजड वाहतूक सुरू आहे. वाहतूकी ही माळेगावातून मुख्य रस्त्यावरून होत असून रस्त्यालगतच जि.प.शाळा, बसस्थानक असल्यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी व नागरिकांची फार मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यातच गाळ वाहतूक करणारी ही अवजड वाहने भरधाव वेगाने गावातून ये-जा करीत असल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात मुख्य रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात चढ-उतार असल्याने दुर्दैवाने वाहनाचे नियंत्रण सुटल्यास मोठी अप्रिय घटना घडण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.


अवजड वाहतुकीला ठराव करून विरोध
ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाकडे सदर वाहतुकी अन्य मार्गाने वळवण्याबाबत लेखी तक्रार केली असता तालुका प्रशासनाकडून उडवा-उडवीचे उत्तरे देऊन तक्रारदार ग्रामस्थांना हुसकावून लावण्यात आले. प्रशासन अवजड वाहतूक करणार्या ठेकेदारांच्या मर्जीने वागत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. ग्रामपंचायतीचा ठराव करीत अवजड वाहतुकीला ठराव करण्यात आला आहे.
