वाघझिर्‍यात भोंगर्‍या बाजारात उसळली आदिवासी बांधवांची गर्दी


यावल : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातील वाघझिरा येथे मोठ्या उत्साहात शनिवारी आदिवासी बांधवांचा भोंगर्‍या बाजार झाला. उद्घाटनाकरीता महाराष्ट्र विधाससभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती उपस्थित होते. येथे दरवर्षी होळीच्या पार्श्वभूमीवर भोंगर्‍याचे आयोजन केले जाते. यंदा देखील येथे सातपुड्याच्या दर्‍याखोर्‍यातून तसेच मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येत आदिवासी समाज बांधव या भोंगर्‍या बाजारात सहभागी झाले. पारंपरिक ढोल वाद्याने उपस्थितांचे लक्ष वेधले होते.

आदिवासी नृत्यांनी वेधले लक्ष
मालोद, ता.यावल या ग्रुप ग्रामपंचायतीमधील सातपुडा पर्वतच्या पायथ्याशी वाघझिरा हे गाव आहे. या गावात सालाबादाप्रमाणेे यंदादेखील शनिवारी भोंगर्‍या बाजार उत्साहात पार पडला. यात आदिवासी बांधवांनी विविध वेश भूषा करून आदिवासी नृत्य सादर केले. मध्यप्रदेशासह विविध भागातून ढोल घेऊन आदिवासी बांधव दाखल झाले. दरवर्षी होळीच्या पहिल्या दिवशी भोंगर्‍या बाजार पारंपारिक पद्धतीने येथे भरवण्यात येतो. या बाजारात मोसमी फळे, द्राक्षे, नागपुरी संत्री, तसेच गोडशेव, फुटाणे, साखरेचे हार-कंगण, ऊसाचा रस, मसाला पान आदींची दुकाने प्रमाणात थाटण्यात आली होती. वाघझिरा जवळील मानापुरी, आंबापाणी, लंगडा आंबा, हेलापाणी, लसुणबर्डी, निमछाव, नागादेवी, जामूनझिरा, शेकमाल, उसमळी, जामण्या, गाड्र्या व इतर गावातील आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.



यांची होती उपस्थिती
प्रसंगी चोपडा पंचायत समितीचे माजी सभापती डी.पी.साळुंखे, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी, शरद कोळी, कडू पाटील, रोहिदास महाजन, भाऊसाहेब धनगर, संतोष धोबी, अनिल साठे, पंचायत समितीचे माजी उपसभापती भारसींग बारेला, सुंदरसिंग बारेला, इडा पावरा, महारु बारेला, चीमा बारेला, सलदार बारेला आदींची उपस्थिती होती. बाजाराचे आयोजन गावातील पंच कमिटी प्रमुख भारसिंग बारेला यांनी केले होते.

ढोल वादकांची स्पर्धा
या भोंंगर्‍या बाजारात सातपुड्यासह मध्यप्रदेशातून विविध प्रकारचे पारंपरिक ढोल घेवून वादक आले. त्यांची स्पर्धा येथे घेण्यात आली. यात सहभागी सर्व ढोलांना भोंगर्‍या बाजारात बक्षीस देण्यात आले. मालोद ग्रामपंचायतीचे सरपंच वाघझिरा येथील रहिवासी रमाबाई भारसिंग बारेला यांच्याकडून आकर्षक बक्षीस देण्यात आले.

वाजंत्रीसाठी आलेल्या ढोलांनी वेधले लक्ष
वाघझिरा परिसरातून साधारण पंचवीस ढोल दाखल झाले. आपापल्या गावातून आणलेल्या ढोलाजवळ गोल करून आदिवासी बांधव वेगवेगळ्या वेशभूषा करून शिस्तीत नाचत होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !