पळासखेडेतील प्रौढाचा पैशांच्या वादातून खून : पत्नीसह दोघांना अटक
पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा
Murder of an adult in Palaskheda due to money dispute : Two arrested along with his wife भडगाव : दाम्पत्यात होत असलेल्या पैशाच्या वादातून पत्नीने परीचिताच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे घडली. पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची उकल करीत दोघांना अटक केली आहे. या घटनेत किशोर शिवाजी पाटील (45, रा.पळासखेडे, ता.भडगाव) यांचा खून झाला.
पैशांच्या वादातून केला खून
भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे किशोर पाटील पत्नी पुष्पा पाटीलसोबत वास्तव्याला होते. किशोर व त्यांच्या पत्नी पुष्पा यांच्यात पैशांचे सातत्याने वाद होते. त्यास कंटाळून पत्नीने परीचयातील राजेंद्र शेळके महाराज (आळंदी, जि.पुणे) यांच्या मदतीने किशोर पाटील यांचा वाहनाची धडक देत खून केला मात्र किशोर पाटील यांचा मृत्यू अपघाताने झाल्याचा देखावा निर्माण करण्यात आला. मयताचे वडील शिवाजी पाटील यांनी भडगाव पोलिसात तक्रार दिल्यानंतर व दाम्पत्यात नेहमीच पैशांच्या वादातून भांडण होत असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत पुष्पा पाटील हिस ताब्यात घेतले. यावेळी विवाहितेने आपल्या पतीला राजेंद्र महाराज याने वाहनातून नेत अपघाताचा बनाव करून ठार मारल्याची कबुली दिल्याने व या गुन्ह्यात त्यांचाही सहभाग आढळल्याने दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन (एम.एच.12 एफ.एस.0010) ताब्यात घेण्यात आले.


वाहनाची धडक देत अपघाताचा केला बनाव
राजेंद्र शेळके याने पैसे देण्याचा बहाणा करून किशोर पाटील यांना पळासखेडे ते तरवाडे रोडवर बोलावून घेतले. त्यानुसार किशोर पाटील हा शनिवार, 30 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता घरातून बाहेर पडला. रस्त्यावर दबा धरून बसलेले राजेंद्र शेळके यांनी अपघाताचा बनाव करून किशोर पाटील याला वाहनाची धडक दिली. हा प्रकार रविवार, 31 मार्च रोजी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास उघडकीला आला.
पोलिसांकडून खुनाची उकल
खुनाची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख, भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्यासह भडगाव पोलीस पथकाने धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला. तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांनी पत्नी पुष्पा पाटील व संशयीत राजेंद्र गंगाधर शेळके (खेळ, आळंदी) यांना अटक केली तसेच गुन्ह्यातील वाहनही जप्त केले आहे. खून प्रकरणी शिवाजी परसराव पाटील यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.अधीक्षक अभयसिंह देशमुख करीत आहेत.