चोपडा शहरातील प्रेमी युगूलाची हत्या : पाच आरोपींना जन्मठेप
पुरावे नष्ट करण्याचा सल्ला देणार्या वकिलासह एकाला पाच वर्षांची शिक्षा
Murder of lovers in Chopra city : Life imprisonment for five accused चोपडा : चोपडा शहरातील प्रेमी युगूलाच्या खून प्रकरणात मयत मुलीच्या भावासह पाच आरोपींना जन्मठेप तर पुरावे नष्ट करण्याचा सल्ला देणार्या वकिलासह दोघांना पाच वर्षांची शिक्षा अमळनेर न्यायालयाचे न्या.पी.आर.चौधरी यांनी सोमवारी सुनावली.
दुहेरी खून खटल्यात आरोपींना जन्मठेप
राकेश संजय राजपूत (22, रामपुरा, चोपडा) व वर्षा समाधान कोळी (20, सुंदरगडी, चोपडा) यांच्यात दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते मात्र तरुण अन्य समाजाचा असल्याने या संबंधास कुटूंबियांचा विरोध होत होता व त्यातून घरात सातत्याने वादही होते. त्यात 12 ऑगस्ट 2022 रोजी राकेश राजपूत हा संशयित आरोपीच्या घरी रात्री आठ वाजता आल्यानंतर आरोपींनी संतापाच्या भरात वर्षा कोळी व राकेश राजपूत दोघांनाही दुचाकीवर बसवून चोपडा शहराजवळील नाल्याजवळ नेले. तेथे राकेश राजपूत याला बंदुकीने गोळी झाडून त्याचा खून केला तर वर्षा कोळी ही प्रतिकार करीत असताना तिची गळा दाबून हत्या केली. चोपडा शहर पोलीस स्टेशनला दुहेरा खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अमळनेर न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. सरकार पक्षातर्फे अमळनेर न्यायालयात दाखल खटल्यात 21 साक्षीदार तपासण्यात आले. विशेष म्हणजे संशयित आरोपींनी गुन्हा केल्यानंतर अॅड.नितीन मंगल पाटील यांच्याकडे जाऊन खुनाबाबत सल्ला घेतल्यानंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा सल्ला दिल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले.


यांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा
या खटल्यात तुषार आनंदा कोळी (23), भरत संजय रायसिंग (22), बंटी उर्फ जय शांताराम अभिमन कोळी (19), आनंदा आत्माराम कोळी (56) रवींद्र आनंदा कोळी (20) यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावला आहे. आरोपी पवन नवल माळी आणि वकील नितीन मंगल पाटील यांना पाच वर्षे शिक्षा आणि एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा अशी शिक्षा सुनावण्यात आली. पैरवी अधिकारी ए. एस.आय.उदयसिंग साळुंखे होते. त्यांना हवालदार हिरालाल पाटील, नितीन कापडणे, राहुल रणधीर, विशाल तायडे आदींनी सहकार्य केले.