खासदार उन्मेष पाटील व करण पवार उद्या मातोश्रीवर शिवसेना उबाटा गटात प्रवेश करणार !
MP Unmesh Patil and Karan Pawar will enter Shiv Sena Ubata group tomorrow on Matoshree! जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्यासह पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार व समर्थक बुधवार, 3 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता उबाटा गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात शिवसेना गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
उद्या होणार प्रवेश सोहळा
जळगाव मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलून त्याजागी भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने खासदार उन्मेष पाटील हे प्रचंड नाराज आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र आता या चर्चा खर्या ठरत आहे. खासदार संजय राऊत यांची खासदार उन्मेष पाटील यांनी मुंबईत मंगळवारी भेट घेत प्रवेशाबाबत चर्चा केली.

जळगाव मतदारसंघासाठी करण पवार यांना संधी !
खासदार उन्मेष पाटील व करण पवार हे आपल्या समर्थकांसह मुंबईत डेरा टाकून आहेत. मंगळवारी दुपारी त्यांची मातोश्रीवर अंतीम चर्चा झाल्यानंतर त्यांचा शिवसेना-उबाठा गटात प्रवेशाचा बुधवारी मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. दुपारी 12.30 वाजता ते समर्थकांसह उबाटा गटात प्रवेश करीत मशाल हाती घेणार आहेत. भारतीय जनता पक्षातील तरुण फळीतील आघाडीचे नेते मानले जाणारे खासदार पाटील हे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवबंधन हाती बांधणार असल्याचे आता स्पष्ट संकेत मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खासदार उन्मेष पाटील यांनाच जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळण्याचे संकेत सुरूवातीला वर्तवले जात असलेतरी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती आहे. करण पवारांच्या मागे खासदार पाटील हे ताकद लावतील शिवाय विधानसभेच्या निवडणुकीत मात्र उन्मेश पाटील यांना आमदारकीचे तिकीट दिले जाईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, उद्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. भाजपासाठी खासदारांचा उबाटा गटात प्रवेश मात्र धक्कादायक ठरणार असून स्मिता वाघ यांच्यासाठी ते कडवे आव्हाण निर्माण करतील यात शंकाच नाही.
सुषमा अंधारेंचे ट्विट : उद्या प्रवेश सोहळा
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार उन्मेश पाटील यांच्या पक्ष प्रवेशाबाबत ट्विट केले आहे. बुधवारी दुपारी 12.30 मातोश्रीवर खासदार उन्मेश पाटील हे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत उबाटा गटात प्रवेश करतील, असे ट्विटमध्ये नमूद आहे. दरम्यान, खासदारांच्या उबाटा गटातील प्रवेशामुळे भविष्यात अनेक राजकीय समीकरणे बदलतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांमधून व्यक्त होत आहे.
लवकरच आपली भूमिका मांडणार : खासदार उन्मेश पाटील
माध्यमांशी बोलताना खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, आपला मनापासून आदर करतो. आपले सगळे प्रश्न, शंका, सूचना याबाबत लवकरच सविस्तर बोलेन. आता बोलणे उचित होणार नाही. लवकरच मोकळेपणाने संवाद साधेन. मी आणि संजय राऊत संसदेत सोबत काम केले आहे. आमची संजय राऊतांशी आणि सहकार्यांशी कायम चर्चा होते. त्यानिमित्ताने संवाद साधायला आलो. प्रत्येक गोष्टीत आपण राजकारण म्हणून पाहू नका. राजकारणापलीकडे मैत्री जपली गेली पाहिजे. आताच्या घडीला मैत्री जपली जात नाही आणि ती मैत्री जपण्याचा हा प्रयत्न आहे. बाकी काही नाही, असे यावेळी खासदार पाटील म्हणाले.




